Vaccination: मुंबईत आज फक्त महिलांसाठी लसीकरण, थेट लसीकरण केंद्रावर जाऊन घेता येणार लस

Vaccination: मुंबईत आज फक्त महिलांसाठी लसीकरण, थेट लसीकरण केंद्रावर जाऊन घेता येणार लस

महिलांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी पुढे यावे यासाठी मुंबईत महिलांसाठीचे विशेष लसीकरण सत्र राबवण्यात येत आहे. मुंबई पालिकेकडून आज महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र राबवण्यात येणार असून थेट लसीकरण केंद्रावर जाऊन महिलांना कोरोना विरोधी लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत महिलांसाठीचे राखीव लसीकरण होणार आहे. मुंबई पालिकेकडून मागील आठवड्यात देखील महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. त्या मोहीमेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंबई पालिकेकडून आज पुन्हा एकदा महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेय.

आज महिलांना लसीकरण करण्यासाठी कोणत्याही ऑनलाईन पूर्व नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन म्हणजेच वॉक इन पद्धतीने लसीकरण करता येईल. मुंबईतील एकूण २७७ निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि सर्व शासकीय आणि पालिका रुग्णालय तसेच कोविड सेंटरमध्ये महिलांसाठीचे विशेष लसीकरण सत्र राबवण्यात येणार आहे. कोरोना विरोधी लसीकरणाचा वेग वाढावा आणि प्रत्येक स्थरातील नागरिकांना कोरोना विरोधी लस मिळावी यासाठी मुंबई पालिकेचे वेळोवेळी प्रयत्न सुरू असतात. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र  हाती घेतले आहे.

१७ सप्टेंबर महिलांसाठीची पहिली विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती त्या मोहीमेला मुंबईतील महिलांनी चांगला प्रतिसाद देत मुंबईतील एकूण पालिका आणि सरकारी केंद्रावर १ लाख ७ हजार महिलांचे लसीकरण पार पडले होते. त्याचप्रमाणे खासगी लसीकरण केंद्रांवर २७ हजार महिलांचे लसीकरण करण्यात आले.


हेही वाचा – मुंबईत शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करणार- महापौर

First Published on: September 27, 2021 8:04 AM
Exit mobile version