Mumbai Crime News : मोबाइल घेण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीचा पत्नीवर हातोड्याने हल्ला

Mumbai Crime News : मोबाइल घेण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीचा पत्नीवर हातोड्याने हल्ला

मुंबई : मोबाइल घेण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून चिडलेल्या पतीने पत्नीवर हातोड्याने हल्ला केल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. या हल्ल्यात अनिता विजय शर्मा ही महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तिचा पती विजय शर्मा याच्याविरुद्ध कुर्ला पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री तीन वाजता कुर्ला येथील गरीबमुल्ला चाळ, साईनाथनगरमध्ये घडली. (Mumbai Crime News : Husband attacks wife with hammer for not paying for mobile phone)

विजय हा त्याची पत्नी आणि मुलांसोबत याच परिसरात राहतो. विजय एका फर्निचर दुकानात तर पत्नी अनिता कपड्याच्या कारखान्यात कामाला आहे. विजयला दारूचे व्यसन आहे. त्यातूनच तो सातत्याने अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत होता. क्षुल्लक कारणावरुन तिला शिवीगाळ करून सतत मारहाण करत होता. रविवारी सायंकाळी सात वाजता विजयने अनिताकडे मोबाइल घेण्यासाठी पैशांची मागणी केली. यावेळी तिने पैसे नसल्याचे सांगितले. याच कारणावरुन या दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. या भांडणानंतर त्याने तिला बेदम मारहाणही केली.

हेही वाचा – Mumbai Crime News : फ्लॅटच्या आमिषाने कलादिग्दर्शकाला 30 लाखांचा गंडा

पहाटे तीन वाजता त्याने पुन्हा वाद उकरून काढत अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी भांडण सुरू केले. मोबाइलसाठी पैसे देत नसल्याच्या राग त्याच्या मनात होता. त्यामुळे त्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्याने घरातील लोखंडी हातोड्याने तिच्या डोक्यावर वार केला. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर तो हातोडा तिथेच टाकून पळून गेला. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल केले. तिथेच तिच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून ही माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अनिताची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली. तिच्या जबानीनंतर पोलिसांनी तिचा पती विजय शर्मा याच्याविरुद्ध मारहाण करुन हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या विजयचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. (Mumbai Crime News : Husband attacks wife with hammer for not paying for mobile phone)

हेही वाचा – Salman Khan : सलमानच्या वांद्रे गॅलेक्सी आणि पनवेल फॉर्महाऊसची महिन्यांपूर्वी रेकी; तपासात माहिती उघड


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

First Published on: April 15, 2024 10:55 PM
Exit mobile version