राजकारण आणि महापालिकेचे नियम; गणेशोत्सव मंडळांना नियमावलीचे ‘विघ्न’

राजकारण आणि महापालिकेचे नियम; गणेशोत्सव मंडळांना नियमावलीचे ‘विघ्न’

काहीही होऊ दे गणेशोत्सव दणक्यात साजरा होणारच! असा सूर ‘माय महानगर’ने आयोजित केलेल्या Facebook Live चर्चा सत्रामध्ये निघाला. मुंबईतील गणेश मंडळांपुढे सध्या पालिकेने आखून दिलेल्या नियमाचे विघ्न आहे. यावर चर्चा करण्यासाठी ‘माय महानगर’ने चर्चा सत्राचे आयोजन केले होते. त्यामध्ये शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर, मनसे नेते संदीप देशपांडे, समम्वय समितीचे कार्याध्यक्ष कुंदन आगस्कर आणि ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संचालक हितेश जाधव देखील सहभागी झाले होते. यावेळी राजकारण बाजुला ठेवून गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला पाहिजे. मराठी सणांवर गदा येता कामा नये. त्यासाठी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज मान्यवरांनी बोलून दाखवली.

 

वाचा – Facebook Live : ‘समन्वय समितीला चॅनलवर चमकण्याची सवय’

शिवसेना – मनसेमध्ये टीकेचे वाग्बाण

गणेशोत्सावर चर्चा सुरू असताना शिवसेना – मनसेमध्ये वादाला सुरूवात झाली. शिवसेना सत्तेमध्ये आहे. मुंबई पालिकेमध्ये ९७ नगरसेवक शिवसेनेचे आहेत. पण मराठी माणसाचे आणि मराठी सणांचे शिवसेनेला काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. तर, जनतेने नाकारलेल्या, केवळ एकच नगरसेवक असणाऱ्या मनसेने आम्हाला शिकवू नये असे प्रतित्युर शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी दिले. यापूर्वी देखील शिवसेना आणि मनसेमध्ये गणेशोत्सावरून होर्डिंग्ज वॉर रंगले होते. मैदानातील हे वॉर आता ‘माय महानगर’च्या न्युजरूममध्ये देखील पाहायाला मिळाले.

वाचा – Facebook Live: ‘पैशांसाठी पालिका अधिकारी गणेश मंडळांना आडकाठी करतात!’

पालिका अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत पालिका अधिकारी गणेश मंडळांना आठकाठी करतात. नियमांवर बोट ठेवले जाते. मग हे नियमांचे पालन केवळ गणेश मंडळांच्या बाबतीच का? आमचे सण साजरे करताना नियमांची आडकाठी का? न्यायालयाने इतर देखील नियम आखून दिले आहेत. त्या नियमांचे देखील पालन झाले पाहिजे. मस्जिदीवरील भोंगे, हॉकर्स यांच्याबाबत देखील नियम आखून दिले आहेत. मग त्यावेळी नियम कुठे जातात. हॉकर्सकडून पैसे मिळतात. पण गणेश मंडळांकडून पैसे मिळत नाहीत. म्हणून मग नियमांवर बोट ठेवून गणेश मंडळांना आडकाठी केली जात आहेत. असा गंभीर आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

‘समन्वय समितीला चमकोगिरीची सवय’

समन्वय समितीला केवळ चॅनलवर चमकोगिरी करण्याची सवय आहे. ज्यावेळी गिरगावच्या राजाचे सामान उचलून नेण्यात आले. त्यावेळ समन्वय समिती गप्प का होती? समन्वय समितीने काहीच कारवाई केली नाही. मी समन्वय समितीचा निषेध करतो. अशा शब्दात ओम तांडव सार्वजनिक गणेश मंडळाचे संचालक गणेश जाधव यांनी समन्वय समितीवर टीका केली आहे. तसेच आत्तापर्यंत समन्वय समितीने गणेश मंडळांशी संपर्कच साधला नाही. हे समितीचे अपयश आहे. तर समिती किती लोकांची आहे हेच आम्हाला माहित नाही. असे देखील हितेश जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे समन्वय समिती आणि गणेश मंडळांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे.

एकीची गरज

या साऱ्या चर्चासत्रामध्ये मान्यवरांनी राजकारण बाजुला ठेवून एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. कारण भांडत राहिल्यास त्याचा परिणाम सणांवर होईल. आपले सण, संस्कृती टिकवायची असल्यास राजकारणाच्या चौकटीतून बाहेर येण्याची गरज यावेळी माय महानगर आयोजित फेसबुक चर्चा सत्रामध्ये निघाला.

पालिकेचे गणेश मंडळांसाठीचे नियम

१ ) मंडपाच्या बाजूला १० फूट जागा सोडावी. जेणेकरून अग्निशमन दल, पादचारी, रुग्णवाहिका यांना कोणताही त्रास होणार नाही.
२ ) मंडपासाठी पालिका, पोलीस, वाहतूक विभाग आणि अग्निशमन दलाची परवानगी घेणे आवश्यक.
३ ) मंडपामध्ये फायर रेझिस्टंट सिस्टीम आवश्यक.
४ ) गाड्यांच्या पार्किंगसाठी १०० मीटर दूर जागा असावी.
५ ) मंडपाबाहेर मंडपाच्या नकाशाचा आराखडा असावा.
६ ) मंडपासाठी खणलेले खड्डे १० दिवसांमध्ये बुजवावेत. त्याचे फोटो पालिकेला पाठवावेत.

गणेश मंडळांच्या मागण्या

१ ) सायलेन्स झोनमधील गणेश मंडळांना लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी द्यावी.
२ ) गणेशोत्सवासाठी १० दिवस लाऊड स्पीकरची रात्री १२ पर्यंत परवानगी द्यावी.
३ ) मुंबईमध्ये सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. त्या ठिकाणावरून मिरवणुकीसाठी पर्यायी रस्ता द्यावा.

First Published on: August 20, 2018 5:21 PM
Exit mobile version