एड्समुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

एड्समुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

एचआयव्ही

सध्या मुंबईसह महाराष्ट्रात एचआयव्ही म्हणजेच एड्सने मृत्यू होण्याची संख्या जास्त आहे. एड्स संबंधित वारंवार जनजागृतीचे उपक्रम राबवले असले तरी मुंबई आजही एड्समुळे मृत्यू होण्याच्या आकडेवारीत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी ही माहिती दिली आहे. शिवाय, केंद्रसरकारच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली या वेबसाईटवरही ही माहिती उपलब्ध आहे.
महाराष्ट्रात १ एप्रिल २०१७  ते ३१ मार्च २०१८ मध्ये एचआयव्हीची लागण झाल्यामुळे १ हजार ३२७ तर मुंबईत ११६ लोकांचा मृत्यू झाला. तसंच , एड्सचं संक्रमण झाल्यामुळे मृत्यू होण्याच्या प्रकरणात महाराष्ट्रातून मुंबई ही दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं केंद्रसरकारच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली या वेबसाईटवरच ही माहिती देण्यात आली आहे. तसंच, महाराष्ट्रात जर ११ एचआयव्हीमुळे मृत्यू होत असतील तर त्यापैकी १ मृत्यू मुंबईत होतो, असंही या वेबसाईटवर नमूद करण्यात आलं आहे.
तर, यावर्षीच्या एप्रिल २०१८ या महिन्यात महाराष्ट्रात १८ जणांचा एड्समुळे मृत्यू झाला आहे आणि मुंबईत या काळात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही.
१ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ महाराष्ट्रात १ हजार ३९० आणि मुंबईत ७२ मृत्यू नोंदवण्यात आले होते. पण, २०१८ मध्ये म्हणजेच यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात फक्त ६३ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. पण, मुंबईत दुसरीकडे यावर्षी ४४ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचंही केंद्रसरकारच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
तसंच, गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात ४ हजार १४३ आणि मुंबईत २१५ लोकांचा एड्समुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई दुसऱ्या क्रमाकांवर

एड्समुळे मृत्यू झालेल्या शहरात मुंबई शहर दुसऱ्या क्रमाकांवर आहे. तर , महाराष्ट्र तिसऱ्या क्रमाकांवर आहे. एड्सच्या निर्मूलनासाठी जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जातात. दुसऱ्या शहराच्या तुलनेनुसार मुंबईला एड्स निर्मूलनासाठी जास्तीचे फंडीग केलं जातं. पण, तरीही ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय, मुंबईत गावाकडून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एचआयव्हीचं संक्रमण होण्याची शक्यता टाळता येत नाही असं आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी सांगितलं.
First Published on: May 18, 2018 1:56 PM
Exit mobile version