मुंबईच्या महापौर PPE KIT सह उतरल्या BKC कोविड सेंटरमध्ये, म्हणाल्या बाळासाहेबांची धाडसाची शिकवण

मुंबईच्या महापौर PPE KIT सह उतरल्या BKC कोविड सेंटरमध्ये, म्हणाल्या बाळासाहेबांची धाडसाची शिकवण

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठे धैर्य दाखवत आज खुद्द बीकेसी कोविड सेंटरमध्ये पीपीई किटसह उतरल्या. त्याठिकाणी रूग्ण, डॉक्टरांशी संवाद साधल्याचेही त्यांनी सांगितले. लोकांमध्ये जनजागृती करणे आमचे काम आहे, तसेच ग्राऊंड रिअॅलिटी पाहणेही आमचे काम आहे. आज बीकेसी येथे ज्या पद्धतीने ग्राऊंड रिअॅलिटी तपासली तशीच रिअॅलिटी संपूर्ण मुंबईभर तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले. नर्सेस आणि डॉक्टरांना या ओमिक्रॉनच्या नव्या संकटात लढण्यासाठी आम्ही मोटिव्हेशन देत आहोत. होय तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत हेच आवाहन मुंबईची महापौर म्हणून केले आहे. त्यावेळी प्रत्यक्ष कोविड सेंटरमध्ये रूग्णांना, डॉक्टरांना आणि नर्सेसना भेटून रूग्णांचे मनोबल वाढवल्याचेही त्यांनी सांगितले. मी पहिल्या दिवसापासून घाबरवले नाही. मुंबईकरांनी घाबरू नका, पण काळजी घ्या, असेही आवाहन त्यांनी केले.

बाळासाहेबांची धाडसाची शिकवण

बाळासाहेबांची आम्हाला धाडसाची शिकवण आहे. त्यामुळे रिअॅलिटी चेक करताना मुंबईकरांसाठी कोरोनाचा संसर्ग झाला आणि संसर्गाने मृत्यू जरी झाला तरीही मी मृत्यूला घाबरत नाही. आम्ही कधीही मुंबईकरांना घाबरवण्याचे काम केले नाही. त्यामुळे आम्ही जे धाडस दाखवतो आहोत तसेच धाडस विरोधकांनीही दाखवावे असेही आवाहन त्यांनी केले. विरोधकांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून लोकांना मृत्यूच्या दारात टाकू नये असेही आवाहन त्यांनी केले आहे.

मुंबईची यंत्रणा सज्ज

आज बीकेसी कोविड सेंटरमध्ये एकुण २५०० बेड्स उपलब्ध आहेत. त्याठिकाणी १०८ बेड्स आयसीयू सुविधेचे आहेत. तर १२ डायलेसीस बेड्स आहेत. १ हजार ३०० बेड्स विना ऑक्सिजनच्या रूग्णांसाठी आहेत. ज्यांना ताप, सर्दी यासारखा आजार आहे, अशा रूग्णांसाठीचे हे बेड्स आहेत. तर ८९० बेड्स ऑक्सिजन बेड्स आहेत. आज बीकेसीत ९५० रूग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी ६७० रूग्ण विना ऑक्सिजन आहेत. तर २८० रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. देवाचे आभार, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांचे आभार की आजच्या घडीला एकही आयसीयू पेशंट नाही.

 

कावीळ झाल्यावर सगळ पिवळच दिसत

विरोधक काय म्हणतात याचा आम्हाला फरक पडत नाही. विरोधकांनी संभ्रम निर्माण करत लोकांना उकसवण्याचे काम करू नये. तसेच गर्दी करण्यासाठी संभ्रम करून लोकांना संकटात टाकू नका असेही आवाहन त्यांनी केले. माझे आघाडी सरकार, ज्या पोडतिडकीने सांगत आहे, लोकांनी नियमांचे पालन करावे हेच आवाहन महापौरांनी केले. कोविड सेंटर घोटाळ्यावर किरीट सोमय्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत मुंबईच्या महापौरांनी थेट उत्तर दिले. एकदा कावीळ झाल्यानंतर सगळ्यांनाच पिवळ दिसत, असेही महापौर म्हणाले. विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा यापुढे कृतीमधून बोलणार असल्याचेही महापौर म्हणाल्या.

लॉकडाऊन, मिनी लॉकडाऊनवर महापौर म्हणतात…

आजच्या घडीला महापालिका म्हणून फुल्ल लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन लावण्याचा महापालिकेचा मानस नाही. कारण १७ हजार रूग्ण हे लक्षणे नसलेले रूग्म आहेत. पण आगामी काळात मात्र लोक असेच बेशिस्त वागत राहिले तर मात्र निर्बंध येऊ शकतात. लॉकडाऊन, मिनीलॉकडाऊन घाबरवण्यासाठी नाही. आपण काळजी घेतली तर लॉकडाऊन टाळता येईल. पण मुंबईकर असेच बेशिस्त वागत राहिले तर मग पर्याय काय ? आम्ही कधीही लॉकडाऊन होणारच असे म्हटलेले नाही, त्या शब्दापासून लांब रहायचे असेल तर नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

मुंबई सोडणाऱ्या नागरिकांना महापौरांचे आवाहन

लोक परत घाबरून निघत आहेत त्यांना माझे हेच सांगणे आहे की, घाबरू नका, आपण सर्वांनी मिळून आलेल्या संकटाला तोंड देऊ. आपण लोकांना नियम सांगतोय. आपण गर्दी करू नये, मास्क उतरवू नका असेही आवाहन केले आहे. मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. फक्त ताळेबंदीची वेळ येऊ नये, असे आवाहन आम्ही करतो आहोत, असेही महापौर म्हणाल्या.


 

First Published on: January 8, 2022 12:17 PM
Exit mobile version