मेट्रोचा प्रवास आता रात्री उशिरापर्यंत; शेवटची गाडी सुटणार पावणे बारा वाजता

मेट्रोचा प्रवास आता रात्री उशिरापर्यंत; शेवटची गाडी सुटणार पावणे बारा वाजता

मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण आता घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेवर मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता उशिरापर्यंत प्रवास करता येणार आहे. मेट्रो १ने गाड्यांची वेळ वाढविण्याबरोबरच या मेट्रो मार्गिकेवरील गाड्यांच्या फेऱ्यांमध्येही वाढ केली आहे. त्यामुळे रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. (Mumbai Metro One Timings Extended last train will run at 11 44 night)

या मार्गावरील शेवटची गाडी रात्री 11:44 वाजता सुटणार आहे. घाटकोपर स्थानकातून ही गाडी सुटणार असून, वर्सोवा स्थानकात रात्री 12:07 वाजता ही गाडी पोहोचेल. तसेच वर्सोवा स्थानकातून रात्री 11:19 वाजता शेवटची गाडी सुटणार असल्याची माहिती ‘मुंबई मेट्रो वन’ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रवाशांची रात्री उशिरा होणारी गैरसोय टाळण्यासाठी मेट्रो 1 ने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, गाड्यांची वेळ वाढविण्यात आली आहे. तसेच, या मेट्रो मार्गिकेवरील गाड्यांच्या फेऱ्यांमध्येही वाढ केली आहे. कार्यालयीन दिवसांमध्ये पूर्वी 326 फेऱ्या होत. आता या फेऱ्यांची संख्या 356 पर्यंत वाढविण्याचा निर्णय एमएमओपीएलने घेतला आहे. यामुळे मेट्रो प्रवाशांचा प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे. तसेच गर्दीच्या वेळेत प्रत्येक 4 मिनिटांनी मेट्रो गाडी धावणार आहे.

मेट्रो १ च्या प्रवाशांमध्ये वाढ होत असून, जुलैमध्ये मेट्रोने 80 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. सद्यस्थितीत कार्यालयीन दिवसात 3 लाख 25 हजार प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवरील प्रवासीसंख्या सव्वा तीन लाखांवर पोहचली आहे.

मुंबईत 2020 साली कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर हळुहळू रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. परिणामी कोरोनाची साथ पसरल्यानंतर मार्च 2020 मध्ये लॉकडाउन लावल्यावर मेट्रो 1 वरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. मेट्रो प्रवास पुन्हा सुरू झाल्यानंतर सुरवातीला केवळ 13 हजार प्रवाशीच होते.

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागल्यावर मेट्रोची प्रवासी संख्या पहिल्यांदा २ लाखांपुढे गेली. आता पुन्हा करोनानंतरची स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर प्रवासीसंख्येत वाढ झाली असली तरी ती करोनापूर्व पातळीपेक्षा कमीच आहे. करोनापूर्वी ४ लाख ते ४ लाख ५० हजार नागरिक दरदिवशी मेट्रोतून प्रवास करत होते.


हेही वाचा – गोंदियातील बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, महिला अधिकाऱ्याची होणार नियुक्ती

First Published on: August 6, 2022 4:58 PM
Exit mobile version