मुंबई मेट्रो २ अ, मेट्रो ७ मार्गाचे कसे आहे वेळापत्रक ? गुढीपाडव्याच्या मुहुर्ताला धावणार मेट्रो

मुंबई मेट्रो २ अ, मेट्रो ७ मार्गाचे कसे आहे वेळापत्रक ? गुढीपाडव्याच्या मुहुर्ताला धावणार मेट्रो

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत गुढी पाडव्याच्या मुहुर्ताला दोन मेट्रो मार्गिकांची भेट मुंबईकरांना देण्यात आली आहे. मेट्रो मार्गिता २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेच्या फेऱ्यांना सुरूवात होणार आहे. एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी या दोन्ही मार्गिकांचे वेळापत्रक कसे असणार याबाबतचा खुलासा केला आहे. मेट्रोच्या २०.७३ किमीचा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत खुला करून देण्यात येत आहे. एकुण ११ ट्रेन या मार्गावर चालवण्यात येणार असून त्या माध्यमातून एकुण १५० फेऱ्या या मार्गावर होतील.

कसे आहे वेळापत्रक ?

मेट्रोकडून एकुण ११ ट्रेन्स या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गावर चालवण्यात येणार आहेत. प्रत्येक ट्रेनला ६ कोचेस आहेत. तर ११ ट्रेन्सची एकुण कोचेसची संख्या ६६ इतकी आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. साधारण ११ मिनिटांनी एक ट्रेन अशा मेट्रोच्या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या ट्रेनची प्रवासी क्षमता ही २२८० प्रवासी प्रति ट्रेन इतकी आहे. तर प्रत्येक कोचनिहाय ५० जणांची क्षमता असणार आहे. ताशी ७० किमी वेगाने या ऑपरेट करण्यासाठी एमएमआरडीएला परवानगी मिळाली आहे. तर यापुढच्या काळात ताशी ८० किमी वेगाने ट्रेन ऑपरेट करण्यासाठी परवानगी मिळू शकते अशी माहिती एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी दिली आहे. आगामी काळात मेट्रोच्या ट्रेनची संख्या वाढवण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

मेट्रो मार्गाची वैशिष्ट्ये ?

– ड्रायव्हरलेस ऑपरेशनसाठी ट्रेन डिझाईन करण्यात आल्या आहेत
– सुरक्षिततेसाठी प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स
– दिव्यांग प्रवाशांसाठी मेट्रो स्थानकांवर सुविधा
– प्रथमोपचाराची रेल्वे स्टेशनवर सुविधा
– महिलांसाठी विशेष कोच


 

First Published on: March 31, 2022 6:17 PM
Exit mobile version