मेट्रोमुळे १ कोटी प्रवाशांची सोय होणार – मुख्यमंत्री

मेट्रोमुळे १ कोटी प्रवाशांची सोय होणार – मुख्यमंत्री

फाईल फोटो

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कल्याणमध्ये मुंबई मेट्रो ५च्या प्रकल्पाच्या भुमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाला उपस्थित लोकांना मुंबई मेट्रो प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, की ‘मुंबई मेट्रो प्रकल्पामुळे कल्याणवासियांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मेट्रो ५ च्या मार्गामुळे भिवंडी मुंबईशी जोडली जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान, या मेट्रो मार्गामुळे पुढील ५ वर्षांत १ कोटी प्रवाशांची सोय होणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.’ मेट्रो ५ चा मार्ग ठाणे – भिवंडी – कल्याण असा असून, याच मार्गाचे आज मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले तसंच राज्यपाल सी. विद्यासागर राव आदी नेते उपस्थित होते.

नाशिक मेट्रोही लवकरच…

कार्यक्रमादरम्यान बोलताना फडणवीस म्हणाले की, सर्व प्रकारच्या मोडचा प्रवास एकाच तिकीटावर करण्याची सोय लवकरच मुंबईत सुरु होणार आहे. याचा फायदा म्हणजे प्रवाशांना एकाच तिकीटावर तुम्ही कोणत्याही ठिकाणी प्रवास करु शकता. अर्बन मोबिलिटीमध्ये सर्वात चांगलं काम हे महाराष्ट्रात होणार असून, आम्ही त्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूर या तिनही प्रमुख शहरांमध्ये मेट्रोची कामं सुरु केली आहेत. या कामांनंतर लवकरच नाशिक शहरातही मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली.

मुंबईतील वाहतुक व्यवस्था सुलभ करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरु असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. रेल्वे स्टेशन, बस स्थानकाजवळ लोकांच्या सोयीसाठी घरांचे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी कार्यक्रमात सांगितलं. दरम्यान, डोंबिवली ते तळोजा आणि मीरा-भाईंदर ते वसई या दोन मार्गावरही मेट्रो धावणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी कार्यक्रमाच्या अखेरीस केली.

First Published on: December 18, 2018 4:41 PM
Exit mobile version