नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर थेट गुन्हे

नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर थेट गुन्हे

कोविड-19 विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाला तसे आदेश दिलेत. तसेच जे पालिकेच्या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत.

वाढती रुग्णसंख्या पाहता घरी विलगीकरण राहणार्‍यांच्या हातावर शिक्के मारावेत, त्यांनी नियम मोडला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. लग्न समारंभ आयोजनाचे नियम मोडणार्‍या आयोजकांसह व्यवस्थापनांवरही गुन्हे दाखल करावेत. मास्कचा उपयोग न करणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये 300 मार्शल्स नेमावेत. तसेच मुंबईतील मार्शल्सची संख्या दुप्पट करावी, पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळणार्‍या इमारती प्रतिबंधित (सील) कराव्यात, यासह विविध सूचना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केल्या आहेत.

कोविड-19 अर्थात कोरोना विषाणूचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. कोरोनाच्या नवीन विषाणूने जगातील काही देशांत हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण वेगाने सुरु आहे. असं असतानाच मागील काही दिवसांत कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.

पालिका प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना?
१) पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणार्‍या इमारती करणार सील
२) होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या हातावर मारणार शिक्के
३) विना मास्क रेल्वे प्रवास करणार्‍यांवर कारवाईसाठी नेमणार ३०० मार्शल
४) विना मास्क फिरणाऱया नागरिकांवर कारवाईसाठी मार्शल्सची संख्या होणार दुप्पट, दररोज २५ हजार जणांवर कारवाईचे लक्ष्य
५) मंगल कार्यालये, क्लब, उपहारगृहे इत्यादी ठिकाणी धाडी टाकण्याच्या सूचना
६) ब्राझिलमधून मुंबईत येणारे प्रवासीदेखील आता संस्थात्मक विलगीकरणात
७) रुग्ण वाढत असलेल्या विभागांमध्ये तपासण्यांची संख्या वाढवणार

या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी गुरुवारी महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे बैठक घेतली. त्यावेळी आयुक्त चहल यांनी परिस्थितीचा आढावा घेत यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले.

First Published on: February 19, 2021 1:15 AM
Exit mobile version