BMC कोट्यावधीचा खर्च करून दहिसर, वालभाट, ओशिवरा नदीचे करणार पुनरुज्जीविकरण

BMC कोट्यावधीचा खर्च करून दहिसर, वालभाट, ओशिवरा नदीचे करणार पुनरुज्जीविकरण

BMC कोट्यावधीचा खर्च करून दहिसर, वालभाट, ओशिवरा नदीचे करणार पुनरुज्जीविकरण

मुंबईमधील नद्यांमध्ये होणाऱ्या प्रदूषणाप्रकरणी केंद्रीय, राज्यस्तरीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने, राष्ट्रीय हरितलवादाने अनेकदा नोटीस बजावून मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आणि प्रसंगी दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारला आहे. अखेर मुंबई महापालिकेचे डोळे उघडले आणि प्रशासनाने, दहिसर, वालभाट, ओशिवरा या नद्यांच्या पुनरुज्जीविकरणाचा, सौंदर्यीकरणाचा व नदीमध्ये सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्याचा आणि त्यासाठी युद्धपातळीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र त्यासाठी मुंबई महापालिका तब्बल १ हजार ३०४ कोटी ५१ लाख रुपये खर्च करणार आहे. यामध्ये, दहिसर नदीच्या पुनरुज्जीविकरण, सौंदर्यीकरण आणि सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ३७६ कोटी ५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. तर वालभाट, ओशिवरा या नद्यांच्या पुनरुज्जीविकरण, सौंदर्यीकरण आणि सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ९२८ कोटी ४६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील महत्वाचे दोन प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहेत. या प्रस्तावावरून विरोधी पक्ष, पहारेकरी भाजप यांच्याकडून सत्ताधारी शिवसेनेला आणि पालिका प्रशासनाला फैलावर घेऊन नदीमधील अनेक वर्षांपासूनच्या प्रदुषणाबाबत जाब विचारला जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नद्यांचे पुनरुज्जीविकरण, सौंदर्यीकरण

मुंबईतील पश्चिम उपनगरातील नॅशनल पार्क येथून दहिसर नदीचे उगम होऊन ती धोबिघाट, संजय नगर, लिंक रोड मार्गे मनोरी खाडीत विसर्जित होते. या नदीची लांबी १३ किमी आहे. या नदीच्या रुंदीकरण, संरक्षक भिंतीचे ९०% काम पूर्ण झाले आहे. तर पोच रस्त्याचे काम ७०% पूर्ण झाले आहे. मात्र त्या दरम्यान या नदीच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्टीमधून, सोसायटीमधून वाहून येणारे सांडपाणी, श्रीकृष्ण नगर व आंबेवाडी येथील तबेल्यातील शेणमिश्रित पाणी हे नदीत सोडले जाऊन नदी प्रदूषित झाली आहे. असाच काहीसा प्रकार वालभाट व ओशिवरा नदीबाबत घडत आहे. वालभाट नदी नॅशनल पार्क येथुन उगम पावते व आरे कॉलनी, एसव्ही रोड, गोरेगाव मार्गे मालाड खाडीत विसर्जित होते. या नदीची लांबी ७ .३१० किमी आहे.

या दोन्ही नदीत रिद्धी- सिद्धी नाला, बिंबिसार नगर नाला, नंदादीप नाला, नेस्को नाला, इंडियन ऑइल नाला, ज्ञानेश्वर नगर नाला इत्यादी नाल्यांचे व आजूबाजूच्या झोपडपट्ट्या, सोसायट्या येथील सांडपाणी मिश्रित होऊन नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे या तिन्ही नद्यांचे पुनरुज्जीविकरण, सौंदर्यीकरण करणे, प्रदूषण रोखणे आणि नदीत मिश्रित होणारे सांडपाणी रोखून त्यावर मलजल प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करणे आणि ते पुन्हा नदीत सोडणे आदी कामांसाठी पालिकेने टेंडर काढले होते.

त्यानुसार, दहिसर नदीचे काम मे. एस.के. – एस. पी. असोसिएट्स या कंत्राटदाराला देण्यात येणार असून त्याने १५ वर्षे परिरक्षण करावयाचे आहे. त्यासाठी या कंत्राटदाराला पालिका ३७६ कोटी ५ लाख रुपये मोजणार आहे.
त्याचप्रमाणे, वालभाट व ओशिवरा या नद्यांच्या पुनरुज्जीविकरण, सौंदर्यीकरण करणे, प्रदूषण रोखणे आणि नदीत मिश्रित होणारे सांडपाणी रोखून त्यावर मलजल प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करणे आणि ते पुन्हा नदीत सोडणे आदी कामांसाठी शाहपूरजी पालनजी आणि कं. कोणार्क या कंत्राटदारांना पालिका १ हजार ३०४ कोटी ४६ लाख रुपये मोजणार आहे.


हेही वाचा – मुंबईत शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करणार- महापौर


 

First Published on: September 26, 2021 9:27 PM
Exit mobile version