पालिकेच्या २५ शाळांमध्ये विचारशील प्रयोगशाळा; साडे तीन कोटींचा खर्च  

पालिकेच्या २५ शाळांमध्ये विचारशील प्रयोगशाळा; साडे तीन कोटींचा खर्च  

अटल विचारशील प्रयोगशाळा

भाजप सरकारने केंद्रात सत्तेवर आल्यानंतर ‘व्यक्तिमत्व विकास’ ही संकल्पना मांडली होती. मुंबई महापालिकेच्या २५ शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, जिज्ञासा, प्रयोगशिलता, विचार करण्याची क्षमता विकसित व्हावी, तसेच संगणक, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करणार आहे. त्यासाठी २५ शाळांमध्ये विचारशील प्रयोगशाळा स्थापन करून त्यातील इलेक्ट्रिक व मेकॅनिकल साहित्याचे परिरक्षण करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पालिका ३ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च करणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

भारत सरकारच्या निती आयोगाद्वारे २०१७ पासून पालिकेच्या निवडक माध्यमिक शाळांमधून अटल विचारशील प्रयोगशाळा (अटल टिंकरिंग लॅब) स्थापन करण्याच्या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. पालिकेच्या ‘ए’ विभागातील कुलाबा पालिका माध्यमिक शाळेला सदर प्रकल्पाअंतर्गत लाभ होऊन त्यामध्ये अटल विचारशील प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली. तसेच, २०१८-१९ मध्ये पालिकेच्या गुंदवली एमपीएस शाळा, पाली चिंबई पालिका शाळा आणि गोवंडी स्टेशन पालिका शाळा अशा तीन शाळांमध्ये विचारशील प्रयोगशाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, जिज्ञासा, प्रयोगशिलता विकसित करणे, तसेच आधुनिक माहिती तंत्रज्ञान संबंधित साधनांचा प्रत्यक्ष वापर करणे, संगणक आज्ञावलीच्या कार्यपद्धतीची माहिती आदीचे ज्ञान आणि अनुभव देणे हा या प्रयोगशाळांमागचा उद्देश आहे. या प्रकल्पासाठी मे. स्टेमरोबो टेक्नॉलॉजी प्रा. लि. या कंत्राटदाराला नेमण्यात येणार असून त्यासाठी त्याला ३ कोटी ४८ लाख रुपये देण्यात येणार आहे. या कंत्राटदाराने पालिकेच्या २५ शाळांमध्ये विचारशील प्रयोगशाळा स्थापन करून त्यातील इलेक्ट्रिक व मेकॅनिकल साहित्याचे ५ वर्षे परिरक्षण करायचे आहे.

First Published on: January 18, 2021 9:35 PM
Exit mobile version