Mumbai News: मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट? आयुक्त म्हणाले, पाणीटंचाई…

Mumbai News: मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट? आयुक्त म्हणाले, पाणीटंचाई…

मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट

मुंबई: मार्च महिन्यापासून मुंबईकरांना 10 टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून केवळ 48 टक्के पाणीसाठा उरल्यामुळे भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा मिळावा अशी मागणी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. परंतु आता यावर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी खुलासा केला आहे. (Mumbai News Water cut crisis for Mumbaikars Commissioner Bhushan Gagarani Said there is no water cut)

मुंबईकरांना यंदा कोणत्याही प्रकारच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही. तलावातील पाणीसाठा हा 15 जुलैपर्यंत पुरेल इतका आहे, अशी ग्वाही मुंबई महापालिका आयुक्‍त भूषण गगराणी यांनी दिली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्याची पातळी झपाट्याने कमी कमी होत आहे. मुंबई शहर व उपनगरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे मुंबईत पाणी टंचाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तशी चर्चा मुंबईकरांत ऐकायला मिळत आहे. त्याची दखल घेऊन पालिका आयुक्त गगराणी यांनी, मुंबईकरांना पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत राहील, असे स्पष्ट केले आहे.

तसेच, जलपुरवठ्याची परिस्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे. गतवर्षी पाऊस कमी झाला होता. जो पाऊस झाला, तो कमी वेळामध्ये जास्त पाऊस झाला होता. त्यामुळे पाणी साठा कमी झाला. भातसा, तानसा जलाशयांची पाणी पातळी खाली गेली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी देखील मुंबईकरांना साधारणतः 15 जुलैपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. यंदा पावसाळा वेळेवर सुरु होऊन समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला असल्याचे आयुक्‍त यांनी म्हटले आहे.

परिसर कायम स्‍वच्‍छ व सुंदर ठेवण्‍याची जबाबदारी नागरिकांची देखील

सार्वजनिक स्‍वच्‍छता हे महापालिकेचे प्राथमिक कर्तव्‍य असून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मुंबई स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सुरु असलेले सखोल स्वच्छता अभियान हे फक्त नावलौकिकासाठी नव्‍हे तर त्याहून जास्त सार्वजनिक आरोग्यासाठी महत्‍त्‍वाचे आहे. सखोल स्‍वच्‍छ मोहिमेला लोकचळवळीमध्ये रुपांतरित करण्यासाठी मुंबई महापालिकेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. ही मोहीम यापुढे देखील सातत्याने व जोमाने सुरू राहील, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईकरांना आश्वस्त केले आहे.

मात्र स्‍वच्‍छता मोहीम राबविल्‍यानंतर तो परिसर कायम स्‍वच्‍छ व सुंदर ठेवण्‍याची जबाबदारी नागरिकांची देखील आहे, असे नमूद करुन मुंबईकर नागरिकांनी स्‍वच्‍छता मोहिमेत सहभागी व्‍हावे, असे आवाहनदेखील आयुक्‍त यांनी केले आहे.
मुंबईत गेल्या २३ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरुप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. या अंतर्गत शनिवारी सर्व २५ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी, शनिवारी सकाळी ७.३० वाजेपासून केलेल्या दौ-यात स्वच्छतेच्या सर्व कार्यवाहीची पाहणी करतानाच स्वतः मोहिमेत प्रत्‍यक्ष सहभाग देखील घेतला. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, उप आयुक्‍त (परिमंडळ ७) रमाकांत बिरादार, उप आयुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे, उप आयुक्‍त (परिमंडळ ५) देवीदास क्षीरसागर, उप आयुक्‍त (परिमंडळ ३) विश्‍वास मोटे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे यांच्‍यासह सहायक आयुक्त (ए विभाग) जयदीप मोरे, सहायक आयुक्त (सी विभाग) उद्धव चंदनशिवे, सहायक आयुक्त (एच पश्चिम विभाग) विनायक विसपुते, सहायक आयुक्त (एच पूर्व विभाग) स्‍वप्‍नजा क्षीरसागर, सहायक आयुक्त (एल विभाग) धनाजी हेर्लेकर, सहायक आयुक्त (एस विभाग) भास्‍कर कसगीकर यांच्यासह संबंधित अधिकारी,कर्मचारी तसेच स्‍थानिक नागरिक उपस्थित होते.

महापालिका आयुक्त गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभी ए विभागातील कुलाबा परिसरातील कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग येथून स्वच्छता मोहिमेस सुरूवात झाली. त्यानंतर सी विभागातील मुंबादेवी मंदीर परिसरात अग्यारी गल्ली येथे भेट देवून आयुक्तांनी स्वतः स्वच्छता कार्यात सहभाग घेतला. एच/पश्चिम विभागात वांद्रे पश्चिममध्ये लीलावती रुग्णालय परिसर, एच/पूर्व विभागात सांताक्रूझ पूर्व भागात प्रभात कॉलनी, एल विभागात साकी विहार रस्ता, एस विभागात हिरानंदानी जंक्शन इत्यादी ठिकाणी महापालिका आयुक्त गगराणी यांनी स्वच्छता मोहिमेतील कामांची पाहणी केली. तसेच सार्वजनिक स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या वेगवेगळ्या कामांची पाहणी करून योग्य ते निर्देश दिले. स्वच्छता कर्मचाऱयांशी थेट संवाद साधून त्यांच्या दैनंदिन कामकाजाची पद्धती, वेळ, कामकाजातल्या अडी-अडचणी यांची देखील त्यांनी माहिती घेतली.
सखोल स्‍वच्‍छता मोहिमेचे सातत्य टिकवले जाणार आहे. मुंबई महापालिकेने कितीही व्यापक स्‍वच्‍छता केली तरी लोकसहभाग असेल तरच या मोहिमेला खरे यश मिळू शकेल. आगामी काळात देखील स्‍वच्‍छतेकामी अधिक प्रभावीपणे कार्यवाही केली जाईल, त्यादृष्टिने मनुष्यबळ, संसाधने, धोरण सुधारणा यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अधिकारी, अभियंते, स्‍वच्‍छता कामगार, साहित्‍यसामुग्री, यंत्रणा आदी नियोजनबद्ध व पूर्ण कार्यक्षमतेने उपलब्ध करून दिले जात आहेत. एकूणच, मुंबईकरांच्‍या आरोग्‍यास प्रशासनाकडून सर्वोच्‍च प्राधान्‍य दिले जात आहे. सखोल स्‍वच्‍छता मोहिमेसाठी प्रक्रिया केलेले पाणी (रिसायकल वॉटर) वापरात येते. यातून हे सिद्ध होते की, पाण्‍याची नासाडी होते, या दाव्यामध्ये काहीही तथ्‍य नाही. महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर ‘रिसायकल वॉटर’ उपलब्ध आहे, असेही आयुक्‍त यांनी निक्षून सांगितले.

पावसाळ्यासाठी यंत्रणा सज्ज

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू आहेत. या कामांचा विभागवार आढावा घेतला असून यंत्रणांना योग्‍य ते निर्देश दिले असल्याचे आयुक्त यांनी सांगितले. तसेच, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही कार्यान्वित केली आहे. विविध शासकीय विभागांसोबत तसेच इतर प्राधिकरणांसोबत बैठका घेऊन त्यांना देखील आवश्यक ते निर्देश दिले आहेत. मोठे नाले – छोटे नाले यातून गाळ काढण्‍याची कामे गतीने सुरू आहेत. ठरवलेल्या वेळापत्रकानुसार ही सर्व कामे पूर्ण करण्‍याचे उद्दिष्‍ट निश्चित करण्‍यात आले आहे. त्याबाबतही विभागपातळीवर बैठका घेतल्या आहेत. दुययम अभियंता, कनिष्‍ठ अभियंता यांच्‍यासह प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळावर कार्यरत असणा-या सगळ्यांकडून एकदा ‘फिडबॅक’ घेतला आहे. रस्‍ते सिमेंट काँक्रिटीकरणाची जी कामे सुरू आहेत, ती कामे प्राधान्‍याने पूर्ण करावीत, यावर भर दिला जात आहे. राडारोडा, बांधकाम साहित्याची योग्‍य प्रकारे विल्‍हेवाट लावावी, असे स्‍पष्‍ट निर्देश दिले आहेत. सखल भागातील पाणी निचरा करण्‍यासाठी पंप कार्यान्वित रहावेत, अधिकाधिक यंत्रणा आणि मनुष्यबळ तैनात करावी जेणेकरुन मुंबईकरांना भेडसावणा-या समस्‍या मार्गी लागतील, आदी निर्देश सर्व संबंधितांना दिले आहेत, असेही आयुक्‍त यांनी नमूद केले.

(हेही वाचा: Mumbai Crime : तडीपार गुन्हेगारासहा तिघांना अटक; एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे, चार काडतुसे जप्त)

First Published on: April 28, 2024 9:00 AM
Exit mobile version