घरक्राइमMumbai Crime : तडीपार गुन्हेगारासहा तिघांना अटक; एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे,...

Mumbai Crime : तडीपार गुन्हेगारासहा तिघांना अटक; एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे, चार काडतुसे जप्त

Subscribe

Mumbai Crime : घातक शस्त्रांसह एका तडीपार गुन्हेगारासह तिघांना काळाचौकी, जुहू आणि मानखुर्द पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून दोन गावठी कट्टे, एक देशी पिस्तूल आणि चार काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहे.

मुंबई : घातक शस्त्रांसह एका तडीपार गुन्हेगारासह तिघांना काळाचौकी, जुहू आणि मानखुर्द पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून दोन गावठी कट्टे, एक देशी पिस्तूल आणि चार काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहे. इक्बाल वलीमोहम्मद शेख, लोकेश राजेश पुजारी आणि ऍलन फ्रॉन्सिस रॉड्रिक्स अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून अटकेनंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Mumbai Crime three criminals arrested; one pistol, four cartridges seized)

घातक शस्त्रांच्या विक्रीसाठी काहीजण विलेपार्ले, रे रोड आणि मानखुर्द रेल्वे स्थानकात येणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर जुहू पोलिसांनी विलेपार्ले येथील विद्यार्थिनी शाळेसमोरील तिलक उद्यानाजवळ साध्या वेशात पाळत ठेवून ऍलन रॉड्रिक्सला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन सापडली. ऍलन हा अंधेरीतील गावदेवी डोंगर, अल मदिना मशीद चाळीत राहतो. पिस्तुलाच्या विक्रीसाठी तो तेथे आला होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. दुसर्‍या कारवाईत काळाचौकी पोलिसांनी इक्बाल शेख याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस जप्त केले आहे. इक्बाल हा रे रोड रेल्वे स्थानकाजवळील कॉटनग्रीन सिमेंट गोदामाजवळ घातक शस्त्रांसह आला होता. तिसर्‍या कारवाईत लोकेश पुजारी या तडीपार गुन्हेगाराला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. लोकेश हा मानखुर्दच्या लल्लूपार्क कंपाऊंडमध्ये राहत असून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी तडीपारची कारवाई केली होती. ही कारवाई सुरु असताना तो मानखुर्द रेल्वे स्थानकात शस्त्रांची विक्रीसाठी आला होता. यावेळी त्याला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस तसेच मोबाइल सापडला.

- Advertisement -

Mumbai Crime : अटक वॉंरटची भीती दाखवून वृद्धेची फसवणूक; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : अटक वॉरंटची भीती दाखवून एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार माहीम परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेलचे अधिकारी करत आहेत. (Mumbai Crime an elderly woman was looted by fearing an arrest warrant; a case has been registered against an unknown person)

तक्रारदार महिला ७१ वर्षांची असून ती माहीम परिसरात एकटीच राहते. गेल्या आठवड्यात तिला अज्ञात व्यक्तीने फोन करत तिच्या आधारकार्डवरुन २५ बँक खाते उघडण्यात आले असून तीन गुन्हे दाखल झाल्याचे सांगितले. तिच्याविरुद्ध लवकरच अटक वॉरंट निघणार असून तिला अटक होणार आहे. या गुन्ह्यांत तिला सात वर्षांचा कारावासासह वीस लाखांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते, अशी भीती देखील त्याने घातली. ही कारवाई थांबवायची असेल तर पैसे द्यावे लागतील असे सांगितले. अटकेच्या भीतीने तक्रारदार महिलेने अज्ञात व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात १ लाख ९४ हजार रुपये ट्रान्स्फर केले. हा प्रकार नंतर तिने तिच्या जावयाला सांगितला. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबरल सेल हेल्पलाईनसह माहीम पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिने अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर माहीम पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

Mumbai Crime : हत्येच्या गुन्ह्यांत दीड वर्ष फरार आरोपीस अटक

मुंबई : हत्येच्या गुन्ह्यांत दीड वर्षांपासून फरार असलेल्या सुफियान युसूफ शेख या २७ वर्षीय आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याचा ताबा नालासोपारा पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. (Mumbai Crime accused absconding for one and a half years arrested in murder cases)

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यांत नालासोपारा येथे एका मशिदीच्या ट्रस्टच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली होती. त्यात एका गटाने दुसर्‍या गटातील तक्रारदारासह मुस्सवीर मोहम्मद अनीस डायस ऊर्फ मच्चूभाई यांच्यावर लाथ्याबुक्यांसह चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या मुस्सवीर याचा नंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी हत्येसह भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. याच गुन्ह्यांत नंतर काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

आरोपींच्या चौकशीतून हत्येच्या या गुन्ह्यांत सुफियानचा सहभाग उघडकीस आला होता. या घटनेनंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरू असतानाच सुफियान हा जोगेश्‍वरी परिसरात राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार जोगेश्‍वरी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून सुफियानला अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आली. तसेच तो याच गुन्ह्यांत दीड वर्षांपासून वॉण्टेड असल्याचे उघडकीस आले. या चौकशीनंतर त्याला पुढील चौकशीसाठी नालासोपारा पोलिसांकडे सोपविण्यात आले.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -