मातोश्री परिसरातील शस्त्रे बाळगणारा आरोपी अटकेत

मातोश्री परिसरातील शस्त्रे बाळगणारा आरोपी अटकेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाच्या परिसरातून एका अट्टल गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या गुन्हेगाराकडे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे आढळली आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वर्षा बंगल्या ऐवजी मातोश्री येथेच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सहाजिकच पोलिसांचा या परिसरातील बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मात्र, असे असताना देखील हा गुन्हेगार या परिसरात का आणि कशासाठी आला होता याचा अधिक तपास आता पोलीस घेत आहेत.

कशी केली कारवाई?

पोलिसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे पूर्वेकडील कलानगर परिसरात शस्रे बाळगणाऱ्या एका संशयिताला अटक केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या गुन्हेगाराचे नाव इर्शाद खान असून, त्याच्याकडून एक देशी पिस्तुल आणि सात जिवंत काडतुस जप्त केली आहेत. कलानगरच्या परिसरात एका सिग्नलजवळ इर्शाद संशयास्पदरित्या फिरताना दिसला असता, हा आरोपी या परिसरात शस्रविक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून याला बेड्या ठोकण्यात यश मिळवलं आहे.

या प्रसंगी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताला पोलिसांनी जरी अटक केली असली तरी याचा येथे येण्यामागे नेमका हेतू काय होता? याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत. संबंधित गुन्हेगारावर या आधीपासून अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबईसह गुजरातमध्ये खून, दरोड्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. याच प्रमाणे बेकायदेशीररित्या शस्रसाठा करणारा हा गुन्हेगार मुख्यमंत्र्याच्या निवसस्थानाच्या परिसरात शस्रविक्री करणार असल्याची माहिती हाती लागताच क्षणी पोलिसांच्या गुन्हेशाखेतील युनिट ९ ने सापळा रचत याच्यावर कारवाई केली आहे.

First Published on: March 2, 2020 4:00 PM
Exit mobile version