नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज!

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज!

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज

आज आपण सर्व वर्ष २०१९ला निरोप देणार आहोत. पण त्याचवेळी वर्ष २०२० चं जल्लोषात स्वागत देखील करणार आहोत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर रात्रभर जल्लोष सुरु असतो. पण या जल्लोषात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस देखील सज्ज झाले आहेत. सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून या जल्लोषावर तसेच गर्दीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यावेळी ४० हजार पोलिसांसह फोर्स वन, एसआरपीएफ, क्यूआरटीची अतिरिक्त कुमक तैनात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

गर्दीवर लक्ष ठेवण्याबरोबरच मुंबई पोलिसांकडून वारंवार तपासणीसुद्धा करण्यात येणार आहे. यासाठी बॉम्बशोधक आणि नाशक पथक, श्वान पथकांची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली.

महिला पोलिसही सज्ज

दरम्यान सेलिब्रेशनमध्ये गर्दीच्या ठिकाणी तसेच रात्री घराबाहेर असणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलिसांची विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. गणवेशात तसेच साध्या वेषात या पोलिसांची पथकं गस्तीवर असणार आहेत.

सागरी सीमांवरही लक्ष

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमिवर नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असणाऱ्या मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबईसह किनारी भागांवरही पोलिसांनी गस्त वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एटीएस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकं सज्ज आहेत. समुद्र किनाऱ्यांवर बोटींमधून गस्त घालण्यात येत आहे.

संवेदनशील ठिकाणांवर पहारा

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमिवर मुंबईतील चौपाट्या, समुद्रकिनारे, मॉल, चित्रपटगृहं, प्रार्थनास्थळं अशा गर्दी जमा होणाऱ्या ठिकाणांची यादी करण्यात आली आहे. गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, गिरगाव चौपाटी, वरळी सी फेस, दादर चौपाटी, जुहू, पवई तलाव आदी गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची अधिकची कुमक तैनात करण्यात आली आहे.

हेही वाचा – आम्ही महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही – येडियुरप्पा

First Published on: December 31, 2019 9:46 AM
Exit mobile version