Video : ‘आरडा-ओरडा कव्हरेज’ पडलं महागात; रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकाराला बसली कानशिलात!

Video : ‘आरडा-ओरडा कव्हरेज’ पडलं महागात; रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकाराला बसली कानशिलात!

एरवी कोणतीही घटना घडली की तिथे गोंधळ घालणारे लोकं/राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, त्यांना आवरणारे पोलीस आणि हा सगळा राडा कव्हर करणारे माध्यम प्रतिनिधी हे चित्र काही न्यूज चॅनलच्या नियमित प्रेक्षकांना नवीन नाही. पण आज मात्र एक वेगळंच चित्र मुंबईत NCB च्या कार्यालयाच्या बाहेर दिसलं. इथ सकाळी १०च्या सुमारास प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींमध्येच राडा झाला आणि तो सोडवायची वेळ पोलिसांवर आली. आणि या सगळ्या राड्याला कारणीभूत होते ते Republic TV न्यूज चॅनेलचे पत्रकार प्रदीप भंडारी!

प्रदीप भंडारी आपल्या कव्हरेजच्या वेगळ्या स्टाईलसाठी सर्वपरिचित आहेत. आजही सकाळी ९.४५ च्या सुमारास ते एनसीबीच्या कार्यालयाबाहेरून मोठमोठ्या आवाजात लाईव्ह कव्हरेज करत होते. तेव्हा कॅमेरा इतर पत्रकारांकडे वळवून ते म्हणाले, ‘ये डिप्रेशन के मरीज पत्रकार बैठे है. चाय बिस्किट वाले पत्रकार है जो आपको खबर नही दिखाएंगे हम खबर दिखाएंगे’. यावर इतर पत्रकारांशी त्यांची चांगलीच बाचाबाची झाली.

पोलिसांनी विनंती करूनही प्रदीप भंडारी त्यांना ऐकत नव्हते. त्यातच त्यांनी ‘मुंबई के ये रिपोर्टर चाय बिस्कुट खानेवाले रिपोर्टर है. यह सही खबर नही बतायेंगे. सही खबर सिर्फ रिपब्लिक चॅनल बतायेगा’, असं वक्तव्य केल्यामुळे त्यावर तिथे उपस्थित असलेले मुंबईचे पत्रकार चांगलेच भडकले. यावेळी प्रदीप भंडारी यांची इतर पत्रकारांसोबत बाचाबाची झाली. त्यात प्रकरण इतकं विकोपाला गेलं की टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि पत्रकार विनोद जगदाळे यांनी थेट प्रदीप भंडारी यांच्या कानशिलात लगावली. शेवटी पोलिसांना मध्यस्थी करून प्रकरण मिटवावं लागलं.

मुंबई पोलिसांनी या घटनेच्या ठिकाणी सर्व पत्रकारांना समज दिली. त्यानंतर पुन्हा असा गोंधळ होणार नाही याची खबरादारीही घ्यायला सांगितली. पण दुपारनंतर रिपब्लिक भारत न्यूज चॅनेलचे पत्रकार प्रदीप भंडारी हे सुरक्षा रक्षकांसह त्याठिकाणी आले. सकाळी घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण होते. पण दुपारनंतर मात्र कोणत्याही वादाचा प्रकार घडला नसल्याचे कळते. या घटनेची दखल मात्र पत्रकारांच्या संघटनांनी घेत मुंबईच्या माध्यमांवर केलेल्या टिप्पणीचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

 

First Published on: September 24, 2020 2:24 PM
Exit mobile version