विनयभंगाच्या घटनेनंतर प्रशासनाला जाग कलिना कॅम्पसमध्ये पोलीस चौकी उभारणार

विनयभंगाच्या घटनेनंतर प्रशासनाला जाग कलिना कॅम्पसमध्ये पोलीस चौकी उभारणार

प्रातिनिधिक चित्र

मुंबई विद्यापीठाच्या सुरक्षेचे वाभाडे उडवून टाकणार्‍या आपलं महानगरच्या वृत्तानंतर झोपी गेलेले विद्यापीठ प्रशासन अखेर जागे झाले आहे. महानगरच्या या वृत्ताने विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण केल्यानंतर अखेर कलिना कॅम्पस येथे दोन पोलीस चौकी उभारण्याची घोषणा शुक्रवारी विद्यापीठ प्रशासनाने केली आहे. यासंदर्भात स्थानिक पोलिसांनी त्तत्वत: मान्यता दिली असून लवकरच या चौकींची उभारणी केली जाणार असल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे रानडे भवनात एका विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार महानगरने बुधवारी प्रकाशित आणले. यावेळी कलिना कॅम्पस येथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची बाबही उजेडात आली होती. या वृत्तानंतर विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण केला असून शुक्रवारी युवा सेनेच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे प्रकुलगुरु रविंद्र कुलकर्णी आणि कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कलिना कॅम्पस येथे सुरक्षेसंदर्भात उपाययोजना राबविण्याची सूचना युवा सेनेच्या शिष्टमंडळातर्फे करण्यात आली. त्यावेळी माहिती देताना विद्यापीठ प्रशासनाने वरील माहिती दिली असल्याचे युवा सेनेचे मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, सिनेट सदस्य सुप्रिया कारंडे, शशिकांत झोरे, शीतल शेठ, प्रविण पाटकर आणि वैभव थोरात यांचा समावेश होता. त्याचबरोबर यावेळी युवा सेनेच्या महिला सिनेट सदस्यांनी या विद्यार्थीनीसोबत बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.

तर विद्यापीठ आणि युवा सेनेच्या शिष्टमंडळात झालेल्या चर्चेनंतर कलिना कॅम्पस येथे दोन पोलीस चौक्या उभारण्यात येण्यास त्तत्वता मान्यता देण्यात आली आहे. तर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. तर विद्यापीठात विद्यार्थिनीसाठी सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम देखील राबविण्यात येणार आहे. तर यापुढे मुंबई विद्यापीठाच्या विमेन्स डेवल्हपमेंट सेलमध्ये महिला पदवीधर सिनेट सदस्यांची नेमणूक करण्याबाबत शिक्कामोर्तब झाला आहे. तर विद्यापीठात विद्यार्थी, कर्मचार्‍यांच्या तक्रारीसंदर्भात अंतर्गत तपास समिती गठीत करण्यासंदर्भात ही कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.

First Published on: August 11, 2018 7:00 AM
Exit mobile version