यंदाही मुंबईची तहान भागणार! सर्व तलावांमध्ये मिळून ९८.९८ टक्के पाणीसाठा!

यंदाही मुंबईची तहान भागणार! सर्व तलावांमध्ये मिळून ९८.९८ टक्के पाणीसाठा!

संग्रहित छायाचित्र

यंदा मुंबईकरांची वर्षभराची तहान भागेल एवढा तलावांमध्ये पाणी साठा जमा होईल का? असा प्रश्न पडलेला असतानाच महापालिकेने मुंबईकरांवर पाणी कपात लागून पाण्याच्या संकटाची कल्पना दिली. कोरोनानंतर मुंबईकरांवर पाण्याचे संकट येईल असे चित्र निर्माण झाले होते. परंतु वरुण राजाने हे संकटही दूर करत तलाव क्षेत्रात बरसात करत सर्व तलाव भरुन टाकले. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पूर्ण तहान भागेल एवढा पाणीसाठा सर्व तलावांमध्ये जमा झाला असून मागील वर्षांच्या आसपासच पाण्याचा साठा दिसून येत आहे.

या वर्षी पाण्याची चिंता मिटली!

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमध्ये पावसाळ्यात जे पाणी जमा होते त्यावरून ३० सप्टेंबरला असलेल्या जलसाठ्यानुसार मुंबईकरांचे पाण्याचे भविष्य वर्तवले जाते. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व तलावांमध्ये ३० सप्टेंबर २०२० रोजी १४ लाख ३२ हजार ६६१ दशलक्ष लिटर अर्थात १ लाख ४३ हजार २६६ कोटी लिटर एवढा पाणी साठा जमा झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी १४ लाख ३३ हजार ४०४ दशलक्ष लिटर अर्थात १ लाख ४३ हजार ३४० कोटी लिटर एवढा पाणी साठा जमा झाला होता. त्यामुळे मागील वर्षी या सर्व तलावांमध्ये ९९.०४ टक्के एवढा पाणी साठा होता तर यावर्षी हा पाणी साठा ९८.९८ टक्के एवढा आहे. मुंबईकरांची वर्षभराची एकूण तहान १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढी आहे. त्यामुळे ३० सप्टेंबर रोजी असलेल्या या साठ्यामुळे मुंबईकरांचे मागील वर्षी प्रमाणे हेही वर्ष पाण्याच्या दृष्टीने चांगले जाणार आहे.

मागील तीन वर्षांतील पाण्याच्या साठ्याची आकडेवारी

३० सप्टेंबर २०२० : १४ लाख ३२ हजार ६६१ दशलक्ष लिटर

३० सप्टेंबर २०१९ : १४ लाख ३३ हजार ४०४ दशलक्ष लिटर

३० सप्टेंबर २०१८ : १३ लाख २३ हजार ५४० दशलक्ष लिटर

 

३० सप्टेंबर २०२० रोजी तलावांमध्ये एकूण साठा (दशलक्ष लिटरमध्ये)

अप्पर वैतरणा : २ लाख २५ हजार ११९ (९९.१५ टक्के)

मोडक सागर : १ लाख २८ हजार ०३८ (९९.३१ टक्के)

तानसा : १ लाख ४३ हजार ६५२ (९९.०२ टक्के)

मध्य वैतरणा : १ लाख ८७ हजार ७५५ (९७.०२ टक्के)

भातसा : ७ लाख १२ हजार ३७३ (९९.३५ टक्के)

विहार : २७ हजार ६९८ (१०० टक्के)

तुळशी : ०८ हजार ०२७ (९९.७७ टक्के)

First Published on: September 30, 2020 3:16 PM
Exit mobile version