वाहतूक कोंडीने मुंबईकर हैराण; अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी लागतात दोन तास

वाहतूक कोंडीने मुंबईकर हैराण; अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी लागतात दोन तास

सर्वसामान्यांना लोकल प्रवेश बंदी… ठिकठिकाणी सुरू असलेली मेट्रोची कामे… कोरोनामुळे खासगी वाहनाला नागरिकांची पसंती… अनलॉकमुळे रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या… यामुळे सध्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी नागरिकांना बेस्ट बसने कार्यालयात पोहचण्यासाठी अर्धा तास लागत होता. तिथे आता दीड ते दोन तास मोजावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, लवकरात लवकर लोकल सर्वसामान्यांना लोकल सुरू करण्याची मागणी वाढत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आले. हे लॉकडाऊन सहा महिन्यांपर्यंत वाढल्याने नागरिक हतबल झाले होते. मात्र आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कामावर जाण्यास सुरुवात झाली आहे. लोकल बंद असल्याने बेस्टने रस्त्यावर एसटी, खासगी बसेस उतरवल्या आहेत. मात्र त्यांनाही प्रचंड गर्दी असते. बसेसमध्ये असलेली गर्दी पाहता अनेकजण कोरोनाच्या भितीमुळे स्वत:ची वाहने घेऊन बाहेर पडत आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने दिसू लागली आहेत. त्यातच अनेक ठिकाणी मेट्रो आणि रस्त्याची कामे असल्याने वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. तसेच ज्या ठिकाणी मेट्रो आणि रस्त्याचे कोणतेच काम सुरू नाही अशा ठिकाणीही काही दिवसांपासून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पूर्वी कार्यालयात वाहनाने पोहचण्यासाठी अर्धा तास लागत होता. तिथे आता दीड ते दोन तास लागत आहेत. त्यामुळे रोज कामावर लेटमार्क लागत आहे. तसेच बेस्टच्या बस वाहतूक कोंडीमध्ये अडकत असल्याने त्या लवकरत येत नसल्याने रोज कामावार जाण्यासाठी व येण्यासाठी किमान दोन ते अडीच तासांचा प्रवास मुंबईकरांना करावा लागत आहे. खासगी वाहनचालकांना वाहतूक कोंडीबरोबरच पेट्रोल व डिझेल मोठ्या प्रमाणात लागत असल्याने वेळेबरोबरच आर्थिक फटकाही बसत आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक कंबरडे मोडले असताना दुसरीकडे आता वाहतूक कोंडीमुळे आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रवासामध्ये बराच वेळ जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या ठिकाणी होते वाहतूक कोंडी

दादर टीटी, दादर प्लाझा, सेना भवन चौक, कबुतरखाना, टिळक ब्रिज, किंग्ज सर्कल, सायन सर्कल, कुर्ला सिग्नल, सुमन नगर, अमरमहल, रमाबाई नगर, घाटकोपर डेपो, चेंबूर ते देवनार, मानखुर्द, वाशी टोलनाका, गांधी नगर ते एल अ‍ॅण्ड टी कंपनी, सीप्झ, माहीम, गुंदवली-अंधेरी ते बोरिवली, घोडबंदर रोड, मस्जिद बंदर येथे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे ईस्टन फ्रीवेवर मस्जिद बंदर ते शिवडीपर्यंत रोज वाहतूक कोंडी होत असते.

मी कामावर रोज बाईकने जातो. गांधी नगर ते सीप्झ या मार्गासाठी पूर्वी मला १५ मिनिटे लागत असे. वाढलेली वाहनांची संख्या आणि मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे आता याच मार्गावरू मला पाऊण ते एक तास लागत आहे. लोकल सुरू झाल्यास वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
– जयंत कंक, बाईकस्वार
अनलॉक सुरू झाल्यापासून मी बसने कामावर जात आहे. पूर्वी भांडूप ते दादर या अंतरासाठी पाऊण तास लागत असे. परंतु आता पूर्वद्रुतगती महामार्गावर घाटकोपर, सुमन नगर, सायन, दादर येथे असलेल्या वाहतूक कोंडीमुळे कामावर पोहचण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहेत. त्यामुळे रोज लेटमार्क लागत आहे.
– महेश मुणगेकर, भांडुप रहिवासी
First Published on: November 9, 2020 3:24 PM
Exit mobile version