भाजप-मनसे युतीच्या चर्चेला जोर ,मुनगंटीवार यांनी केले समर्थन,फडणवीसांनी शक्यता फेटाळली

भाजप-मनसे युतीच्या चर्चेला जोर ,मुनगंटीवार यांनी केले समर्थन,फडणवीसांनी शक्यता फेटाळली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतियांबाबतच्या त्यांच्या भूमिकांचे व्हिडिओ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे-भाजपच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच भविष्यात भाजप-मनसे युती झाली तर त्यात गैर काय, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. राज यांचा मलाही फोन आला होता. येत्या काही दिवसात मी त्यांची भेट घेईन, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे भाजप-मनसे युतीची चर्चा जोर धरू लागली असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या पार्किंग लॉटमध्ये ओझरती भेट झाली होती. त्याचवेळी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविषयी माझी नेमकी काय भूमिका आहे, याच्या क्लिप्स तुम्हाला मी पाठवतो, असे राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते. त्यानुसार मनसेकडून या क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. त्यामुळे राज ठाकरे आगामी पालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी उत्सुक आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्याची घडामोड पाहता या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल पडले आहे. आता चंद्रकांत पाटील लवकरच भाजप आणि मनसेच्या युतीसंदर्भात घोषणा करतील, असे सांगितले जात आहे.

फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केले. भाजपला भाषेच्या आधारावर होणारा भेदभाव मान्य नाही. मनसेने त्यांची भूमिका बदलायला हवी. त्यांनी अलिकडच्या काळात हिंदुत्वाद स्विकारला आहे. पण त्यांनी मूळ भूमिका बदलली असती तर विचार केला असता; पण आज युतीची कोणतीही चर्चा नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

First Published on: July 27, 2021 5:12 AM
Exit mobile version