मुंबईपेक्षा नैनाक्षेत्र मोठे होणार -मुख्यमंत्री

मुंबईपेक्षा नैनाक्षेत्र मोठे होणार -मुख्यमंत्री

Naina Integrated Plan

वार्ताहर:-मुंबईपेक्षा नैनाक्षेत्र मोठे क्षेत्र होणार आहे. त्यासंदर्भात नियोजन सुरू झाले असून नैनाचा इंटिग्रेटेड प्लॅन मंजूर करण्यात आला आहे. एखादा प्रकल्प पूर्ण करायचा असल्यास जमीन अधिग्रहित करावी लागते. घरे तोडावी लागतात. यासाठी नैना इंटिग्रेटी मोबालिटी प्लॅन तयार केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.नेरुळ ते खारकोपर या उरण मार्गावरील उपनगरीय ट्रेनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन फडणवीस व रेल्वे व कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुंबईपेक्षा मोठे क्षेत्र निर्माण करण्यासाठी रेल्वे, मोनो मेट्रो, रस्ते, बसेस अशा अनेक गोष्टींची आखणी करण्यात आली आहे. ३६० अंशतः मोबिलिटी सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. एकाच अ‍ॅथोरिटीखाली विकास करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, २००५ नंतर या भागात पहिल्यांदा स्टेशन व रेल्वे लाईन तयार करण्यात आली आहे. याआधी प्रकल्प उशिरा होण्याची परंपरा होती. मात्र आम्ही वेळेआधी काम पूर्ण करून दाखवलेलं आहे. हा आमच्या काम करण्यातला फरक आहे.

याआधी मुंबईचा विचार करायचो, मात्र काळानुरूप आता महामुंबईचा विचार केला जात आहे. पूर्वी संस्कृती ही नदीच्या काठी तयार होत होती. मात्र आधुनिक काळात वसाहत ट्रान्सपोर्टेशनजवळ संस्कृती तयार होते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे महाराष्ट्र व मुंबई रेल्वेला भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.यावेळी रेल्वे व कोळसा मंत्री पियुष गोयल म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने एकत्र येऊन काम केले तर कसे लवकर यश मिळते हे आजच्या उद्घाटनावरून दिसून आले. ९ महिने आधी हे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे, असे गोयल यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच त्यांनी स्वतः शिकत असताना केलेल्या मुंबईतील रेल्वेच्या प्रवासाची आठवण जगवली. मुंबई रेल्वेसाठी मागील बजेटमध्ये ६० हजार कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. लवकरच मुंबईत एसी ट्रेन सुरू होणार असून ४० ट्रेनची ऑर्डर देण्यात आली आहे. उरण रेल्वेचा पुढील टप्पा एका वर्षात पूर्ण होईल.

देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना गोयल म्हणाले की ते ७२ लाख करोडचे लक्ष्य ठेवणारे एकमेव मुख्यमंत्री आहेत. यावेळी अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी पेणवासीयांचे शटलचे स्वप्न होते, मात्र थेट विद्युतीकरण केल्याने तसेच वसई ते पेण रेल्वे सुरू करण्याबद्दल गोयल यांचे आभार मानले. पेण ते अलिबाग ट्रेन लवकर सुरू करा, आरसीएफ व मंत्री अनंत कुमार यांनी सर्व परवानग्या दिल्या आहेत, असे सांगितले. पुढील काळात महामुंबई झाल्यावर खारकोपर हे मध्यवर्ती स्थानक होणार असल्याचे गीते यांनी नमूद केले.

First Published on: November 12, 2018 2:29 AM
Exit mobile version