तुकाराम मुंढेंचा ‘हा’ फोटो खूप काही सांगून जातो!

तुकाराम मुंढेंचा ‘हा’ फोटो खूप काही सांगून जातो!

तुकाराम मुंढे

नाशिकमध्ये आपल्या कठोर शिस्तीच्या भूमिकेमुळे लोकप्रतिनिधींच्या नाकी नऊ आणणारे नाशिक महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने शुक्रवारी बदली करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो आयुक्त कार्यालयाबाहेरचा आहे. तसं बघायला गेलं तर हा फोटो नक्की कधीचा आहे? तो कुणी काढला? तो नक्की कोणत्या आयुक्त कार्यालयाबाहेरचा आहे? याविषयी कोणतीही खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये हा फोटो व्हायरल होत असल्यामुळे त्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

व्हायरल फोटोत दिसतंय काय?

या फोटोमध्ये तुकाराम मुंढे आयुक्त कार्यालयातून बाहेर पडताना दिसत आहेत. मागे भिंतीवर ‘आयुक्त कार्यालय’ असं लिहिलेलं आहे. मुंढेंच्या बाजूला दोन कमांडो, मागे एक पोलीस आणि सोबत त्यांचे स्वीय सहाय्यक दिसत आहेत. मात्र, या फोटोमधली सर्वात जास्त लक्षात राहणारी बाब म्हणजे तुकाराम मुंढेंच्या चेहऱ्यावर दिसणारे भाव. एकीकडे लोकांकडून तुकाराम मुंढेंना प्रचंड पाठिंबा मिळत असताना, त्यांची बदली झाल्यानंतर लोकं रस्त्यावर उतरत असताना त्यांच्या कामाला लोकांकडून मिळालेली ती पावतीच आहे. मात्र, दुसरीकडे मुंढेंना पालिकेतल्या लोकप्रतिनिधींच्या नाराजीचे धनी व्हावं लागलं. तसं पाहाता ही सरकारी पातळीवरून झालेली बदली असल्याचं जरी दिसत असलं, तरी त्या त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींच्या नाराजीमुळेच मुंढेंची बदली झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच की काय, गेल्या १२ वर्षांमध्ये तुकाराम मुंढेंच्या ११ बदल्या झाल्या आहे. विशेष म्हणजे मागच्याच महिन्यात नागपूरमध्ये झालेल्या राज्यभरातल्या महापौरांच्या बैठकीमध्ये मुंढे कोणत्याच पालिकेमध्ये आयुक्त म्हणून नको यायला, अशा स्वरूपाचा ठराव देखील मंजूर करण्यात आला होता.


वाचा काय म्हणतायत मुंढे बदलीबाबत – वारंवार बदलीचा कुटुंबियांवर होतो परिणाम

फोटो नक्की कधीचा?

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो नाशिक महिनगर पालिकेमधला असल्याचं सांगितलं जात आहे. नाशिक महानगर पालिकेमधून तुकाराम मुंढे बाहेर पडत असतानाचा हा फोटो जरी असला, तरी तो बदली झाल्यानंतरचा नसून त्याआधीचा असल्याचं देखील आता सांगितलं जात आहे. मात्र, फोटो कधीचाही आणि कुठलाही असला, तरी त्यामध्ये योगायोगाने मुंढेंच्या चेहऱ्यावरचे भाव खूप बोलके आहेत असंच म्हणावं लागेल!

First Published on: November 22, 2018 10:20 PM
Exit mobile version