नायर हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह; आजारपणाला टाळण्यासाठी उपक्रम

नायर हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह; आजारपणाला टाळण्यासाठी उपक्रम

नायर हॉस्पिटल

मुंबईतील पालिकेच्या बा.य.ल. नायर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांसाठी विविध उपक्रमांद्वारे पोषण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात आहारासंदर्भाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यावर्षी राष्ट्रीय पोषण महासप्ताह राबवण्याचा निर्णय घेतला असून यानिमित्त नायर हॉस्पिटलमध्ये हा सप्ताह राबवण्यात येणार आहे. नायर हॉस्पिटलमध्ये प्रथमच असा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी तीन गट करण्यात आले आहेत. या सप्ताहात इथल्या कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी सांगण्यात आलं आहे.

प्रथम येणारी व्यक्ती ठरेल नायर हॉस्पिटलची सुगरण

नर्सिंग स्टाफ यांना अॅनेमिया या आजारासाठी कोणकोणते पदार्थ खाता येतील यासाठीचे पदार्थ तयार करण्यासाचे सांगितले आहे. तसंच, डॉक्टरांना मधुमेह आणि हृदयाच्या विकारासंबंधित पदार्थ, आरोग्य स्नेही आणि प्रशासकीय कर्मचारी यांनाही काही पदार्थ तयार करण्यास सांगण्यात आले आहे. यात प्रथम येणाऱ्याला नायरची सुगरण म्हणून गौरवण्यात येणार आहे. खाद्यपदार्थ हाताळताना वैयक्तिक आणि स्वयंपाक घरातील स्वच्छतेच्या टिप्स देण्यात येणार असल्याचे मेडिसीन विभागाचे डॉ. अंकुश पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – नायर हॉस्पिटलकडून फिरत्या दंत दवाखान्याची सुविधा!

‘आजाराला बळी पडण्याअगोदरच काळजी घेणे जरुरीचे’

बालरोग विभाग आणि महिला आजार प्रभाग, बाह्यरुग्ण तपासणी कक्षातही पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. एखाद्या आजाराला बळी पडण्याआधीच आपण काळजी घेणे गरजेचे असून त्यासाठी आहार, स्वच्छता आणि खाद्यपदार्थ हाताळणी संदर्भात माहिती देण्यात आल्याचे आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री परांजपे यांनी सांगितले.

सध्या वाढणाऱ्या आजारांमध्ये मधुमेह, अतितणाव, हृदयरोग यांचा समावेश आहे. त्यामुळे पालेभाज्या, कडधान्य, कमी फॅट असलेले पदार्थ आहारात असणे आवश्यक आहे. त्यासाठी हा सप्ताह राबवण्यात आला असून त्याचा फायदा रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना देखील झाला आहे.
-डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर हॉस्पिटल
First Published on: October 11, 2019 3:51 PM
Exit mobile version