त्या नगरसेविकेचे पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र ठरवले अवैध

त्या नगरसेविकेचे पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र ठरवले अवैध

उल्हासनगर महापालिका

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पॅनल १७ मधून इतर मागासवर्गीय या आरक्षणावर निवडून आलेल्या सुमन सचदेव यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या बळावर पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी सुमन सचदेव यांचे नगरसेवक पद रद्द केल्यास एका पंचवार्षिकमध्ये एका जागेसाठी दुसऱ्यांदा पोटनिवडणूक लागणार आहे. उल्हासनगर महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर प्रभाग १७ मधून पूजा कौर लबाना या इतर मागासवर्गीय या आरक्षण असलेल्या जागेवरून निवडून आल्या होत्या. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हरलेल्या कॉग्रेसच्या उमेदवार जया साधवानी यांनी हरकत घेतली होती. त्यामुळे पूजा लबाना यांचे नगरसेवक पद रद्द होऊन मागील वर्षी पोट निवडणूक लागली होती.

वाचा – उल्हासनगर पालिका आयुक्तांनी मांडला 549 कोटींचा अर्थसंकल्प

पुरावे देऊ न शकल्याने प्रमाणपत्राची वैद्यता रद्द

या पोटनिवडणुकीत भाजप कडून साक्षी पमनानी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुमन सचदेव आणि काँग्रेसकडून जया साधवानी ह्या रिंगणात होत्या. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन सचदेव यांचा २०३ मतांनी विजयी झाला. सुमन सचदेव या जया साधवानी यांची चुलत बहीण असल्यामुळे दोघांचेही जात प्रमाणपत्र एकाच पार्शवभूमीचे होते. असे असताना ही जया साधवानी यांनी जात पडताळणी समितीसमोर सुमन सचदेव यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याची सुनावणी घेतली. त्यात सुमन सचदेव या पुरावे देऊ न शकल्यामुळे जात पडताळणी कमिटीने जात प्रमाणपत्राची वैद्यता रद्द ठरवल्याचा आदेश काढला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते भरत गंगोत्री यांनी सांगितले की सुमन सचदेव ह्या जया साधवानी यांचे काका अशोककुमार उदासी यांची मुलगी आहे. उदासी यांच्या कुटुंबातील सहा जणांना जात वैद्यता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या पार्शवभूमीवर न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा – उल्हासनगरमधील ‘गोल मैदान बचाव’साठी ‘स्वाक्षरी मोहीम’

First Published on: February 8, 2019 9:12 AM
Exit mobile version