पवारांचे ठाकरेंना अनुमोदन अन् राज्यपालांची फिरकी

पवारांचे ठाकरेंना अनुमोदन अन् राज्यपालांची फिरकी

राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना मदतीची घोषणा झाल्यानंतर त्यापाठोपाठच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी १६ हजार कुटूंबांना राष्ट्रवादीकडून मदतीची घोषणा केली. संपुर्ण राज्यातील पुरपरिस्थितीच्या आढाव घेणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टिप्पणी केली आहे. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या केंद्रातील नेतृत्वाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. तर दुसरीकडे राज्यपालांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावरही शरद पवार नेमक बोलले आहेत. एकुणच पवारांनी ठाकरेंना केंद्राच्या मुद्द्यावर अनुमोदन दिल्यानंतर राज्यपालांचीही फिरकी घ्यायला पवार विसरले नाहीत.

ठाकरेंबाबत काय म्हणाले शरद पवार ?

शरद पवार यांना पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या केंद्रातील नेतृत्वाबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्याचवेळी शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील व्यक्ती जर केंद्रात जाणार असेल तर मला आनंदच असेल अशी टिप्पणी शरद पवार यांनी यावेळी केली. त्यामुळे ठाकरेंच्या दिल्लीतील नेतृत्वाबाबत शरद पवारांनी एक प्रकारे आनंद व्यक्त करत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याआधी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही अनेकदा शिवसेनेची दिल्लीतील ताकद वाढवतानाच दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासाठी विरोधी पक्षांमध्ये असलेली पसंती याबाबतची माहितीही वेळोवेळी दिलेली आहे.

राज्यपालांना पवारांचा चिमटा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी भाजपचे निलंबित आमदार आशिष शेलार त्यांच्यासोबत आहेत. या दौऱ्याबाबत शरद पवार यांना विचारणा करण्यात आली. राज्यपाल लोकांना उभे करण्यासाठी जात असतील. त्यांचा संपर्क दौरा असेल, त्यामुळे त्यांचे जाणे ठीक आहे. पण राज्यपाल म्हणून केंद्राकडून मदत मिळवून द्यावी असा चिमटाही त्यांनी राज्यपालांना काढला. ज्यांचा त्याठिकाणी दैनंदिन संबंध नाही, अशा लोकांनी त्याठिकाणी दौरे करणे टाळावेत. तसेच असे दौरे टाळण्याचा प्रयत्न करावा, असेही आवाहन शरद पवार यांनी केले.


 

First Published on: July 27, 2021 2:11 PM
Exit mobile version