गणेश नाईकांना लोकसभेसाठी उतरवण्याची राष्ट्रवादीची रणनीती

गणेश नाईकांना लोकसभेसाठी उतरवण्याची राष्ट्रवादीची रणनीती

लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्या तरी कोणत्याही पक्षाकडून मैदानी जंग सुरु झालेली नाही. सर्वत्र अंतर्गत मोर्चेबांधणी सुरु असल्याने उमेदवारही गुलदस्त्यातच आहेत. मोदी लाटेत वाहून गेलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार संजीव नाईक हे पुन्हा सक्रीय झाले असले तरी गणेश नाईक यांनी यावेळी स्वतः लोकसभेच्या मैदानात उतरायला हवे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सन २०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक अटीतटीची होणार असल्याने उमेदवारही त्याच ताकदीचा असला पाहिजे, असा सूर पक्षातून उमटू लागला आहे. शिवसेना अथवा भाजपला टक्कर द्यायची असेल तर गणेश नाईक यांनीच पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणी होत असली तरी त्याला प्रत्यक्षात गणेश नाईक यांनी दुजोरा दिलेला नाही.

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना ५९५३६४ मते पडली होती. तर त्याच वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांना ३१४०६५ मते पडली. मोठ्या फरकाने नाईक यांचा पराभव झाल्याने त्यांचे नवी मुंबई शहरावरील वर्चस्व संपुष्टात आले. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही गणेश नाईक यांचा पराभव झाला.

पदाधिकार्‍यांची मागणी

गणेश नाईक यांचा पराभव झाला असला तरी राष्ट्रवादी पक्षात त्यांचे एक विशिष्ट स्थान आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हे त्यांच्या पसंतीचेच असतात. संजीव नाईक हे जर ठाण्यातून उभे राहिले तर गणेश नाईक यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी जाहीर इच्छा तेथील पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.आनंद परांजपे यांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढण्यास असमर्थता दाखवल्याने नाईकांची मागणी वाढली आहे.शिवसेनेकडून राजन विचारे यांनाच उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. भाजपकडून कोणाचेही नाव चर्चेत नसल्याने युती होवो अथवा न होवो राजन विचारे हे लोकसभेचे उमेदवार असणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

राष्ट्रवादी, सेनेतच थेट लढत

काँग्रेस आणि भाजपकडे लोकसभेसाठी उमेदवार नसल्याने यंदा राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यातच थेट लढत होणार हे नक्की आहे. गेल्या वर्षभरापासून शिवसेनेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपनेही ‘वन बूथ टेन नेशन’ हे मिशन राबवल्याने त्यांचीही अंतर्गत बांधणी झाली आहे. शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते या विचाराने शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्र पक्ष बांधणी करत आहेत. राष्ट्रवादीचा नवी मुंबई बालेकिल्ला असला तरी त्यांना कळवा – मुंब्रा, बाळकुंम, घोडबंदर, मीरा-भाईंदर पट्यात आपली ताकद वाढवावी लागणार आहे. ठाणे जिल्हा शिवसेनेचा गड असल्याने तो फोडण्यासाठी नाईकांना प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागणार आहे.

First Published on: November 20, 2018 5:06 AM
Exit mobile version