कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या अंत्यविधीस निष्काळजीपणा; मुलांविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या अंत्यविधीस निष्काळजीपणा; मुलांविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करताना दिरंगाई दाखविल्याने ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मृताच्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर – ३ येथील खन्ना कंपाऊंड या परिसरात राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, या व्यक्तीचा ९ मे २०२० रोजी मृत्यू झाला होता. उपचारादरम्यान हा व्यक्ती संदिग्ध कोरोनाबाधित असल्याचा वैद्यकीय अहवाल मध्यवर्ती रुग्णालयातील  डॉक्टरांनी दिला होता, त्याचा मृतदेह सावधगिरीने प्लास्टिकने गुंडाळण्यात आला होता. हा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना देण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिला होता.


कोरोनाच्या मृतदेहाला आंघोळ घालणारे १० जण कोरोनाबाधित


मृताच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारसाठी मृतदेह ताब्यात द्यावा, अशी विनंती केली होती आणि मृतदेहावरील कव्हर न हटविता थेट अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी लेखी हमी लिहून देखील दिली होती, मात्र मृतदेह घरी घेवून गेल्यानंतर १० मे २०२० रोजी शांतीनगर स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यापूर्वी मृतदेहावरील कव्हर हटविण्यात आला व आंघोळ देखील घालण्यात आली होती. यामुळे मृताच्या ९ नातेवाईकांना कोरोनाची बाधा झाली असून ८० जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते .

मृताच्या नातेवाईकांच्या दिरंगाई मुळेच हा गंभीर प्रकार घडला असल्यामुळे त्याची उल्हासनगर मनपा प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरू होती. अखेर मनपा प्रशासनातर्फे प्रभाग समिती २ चे सहाय्य आयुक्त भगवान कुमावत यांनी या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी मयताच्या तिन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत .

First Published on: May 16, 2020 7:26 PM
Exit mobile version