कोरोनाच्या मृतदेहाला आंघोळ घालणारे १० जण कोरोनाबाधित

कोरोनाच्या मृतदेहाला आंघोळ घालणारे १० जण कोरोनाबाधित झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ulhasnagar corona patient funeral in the presence of 70 people 10 infected by corona

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या मृतदेहाला आंघोळ घालून त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्यांपैकी १० जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

उल्हासनगरमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीचा ९ मे रोजी मृत्यू झाला होता. या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना द्यायला मध्यवर्ती रुग्णालयाने नकार दिला. मात्र, आम्ही लॉकडाऊनचे सर्व नियम पाळू असे कुटुंबियांनी लेखी आश्वासन दिले. त्यामुळे रुग्णालयाने मृतदेह कुटुंबाकडे दिला.

मात्र, या व्यक्तींने लेखी आश्वासन देऊन देखील तो मृतदेह उघडून त्याला आंघोळ घातली. यावेळी सर्वांचे मृतदेहाला हात लागले. तसेच अंत्यविधीला २० जणांचीच परवानगी असताना देखील त्यावेळी ६० ते ७० लोक उपस्थित होते. त्यानंतर त्या व्यक्तीचा ११ मे रोजी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. ही घटना उल्हासनगर महापालिकेला कळताच अंत्यविधीला उपस्थित असणाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर १० जणांपैकी ९ जण हे त्या व्यक्तीच्याच कुटुंबातील आहेत तर एक जण परिसरात राहणार असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – भयाण वास्तव! पायी निघालेल्या दोन मजुरांचा उपासमारीने मृत्यू