नव्या नियमाचा फार्मसीला फटका

नव्या नियमाचा फार्मसीला फटका

drugs

रोजगाराची हमखास खात्री असलेल्या फार्मसी अभ्यासक्रमाकडे काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा ओढा वाढत होता. परंतु ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनकडून (एआयसीटीई) नव्याने निश्चित केलेल्या नियमाचा फटका फार्मसीला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना बसत आहे. बारावीला 50 टक्क्यांसह फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्समध्ये 45 ते 50 टक्के गुण त्याचबरोबर सीईटीच्या परीक्षेत 50 टक्के गुण बंधनकारक केले आहे. या नव्या नियमामुळे दरवर्षी किमान पाच ते सहा हजार विद्यार्थी फार्मसीच्या प्रवेशापासून मुकत आहेत.

फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना फार्मसिस्टबरोबरच अनेक मल्टिनॅशनल कंपनीमध्ये एक्झ्युटिव्ह, मेडिकल रिप्रेझेटेटिव्ह यासह अनेक नोकर्‍यांच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच व्यवसायाच्याही संधी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे काही वर्षांपासून फार्मसी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. फार्मसीकडे विद्यार्थ्यांचा वाढत असलेल्या ओढ्यामुळे फार्मसीच्या कॉलेजांच्या संख्येतही तितक्याच मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गतवर्षी राज्यामध्ये फार्मसीचा अभ्यासक्रम शिकवणार्‍या 213 संस्था होत्या. त्यात यंदा 67 संस्थांची वाढ होऊन हा आकडा 280 वर गेला. त्यामुळे जागांमध्येही मोठ्या प्रमाणा वाढ झाली गतवर्षी राज्यामध्ये 13 हजार 132 जागा होत्या. हा आकडा यावर्षी 19 हजार 725 पर्यंत पोहचला.

मात्र फार्मसीला प्रवेश प्रक्रियेबाबत एआयसीटीईकडून आणलेल्या नव्या नियमाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. एआयसीटीईच्या नव्या नियमानुसार फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीला 50 टक्क्यांसह फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्समध्ये 45 ते 50 टक्के गुण त्याचबरोबर सीईटीच्या परीक्षेत 50 टक्के गुण असणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी सीईटी व पीसीएमचे गुण ग्राह्य धरले जात होते. त्यामुळे विद्यार्थी सीईटीच्या परीक्षेकडे अधिक लक्ष देत होते. परंतु एआयसीटीईच्या नव्या नियमानुसार अनेक विद्यार्थी सीईटी व फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्सच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवतात. परंतु त्यांना बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळतात.

तर काही विद्यार्थ्यांना पीसीएममध्ये कमी गुण मिळतात. सीईटीमध्ये उत्तम गुण मिळतात,पण बारावीच्या परीक्षेत कमी गुण असल्याने दरवर्षी जवळपास पाच ते सहा हजार विद्यार्थी प्रवेशापासून मुकतात. या पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांचे दोन वर्षांपासून फार्मसीला प्रवेश घेण्याचे स्वप्न भंग होत असल्याची माहिती सीईटी सेलचे परीक्षा समन्वयक एस.के. महाजन यांनी दिली. एकीकडे विद्यार्थ्याचा कल फार्मसीकडे वाढत असताना एआयसीटीईच्या नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांना फार्मसीला मुकावे लागत आहे.

फार्मसीला अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
वर्षे -नोंदणी -ऑप्शन भरलेले विद्यार्थी -संस्था -जागा
2018 -63562 -56952 -213 -13132
2019 -56551 -51022 -280 -19725

First Published on: July 14, 2019 4:51 AM
Exit mobile version