मोनो, मेट्रोसाठी नवीन तिकिट प्रणाली 

मोनो, मेट्रोसाठी नवीन तिकिट प्रणाली 

अनलॉकिंगच्या टप्प्यात मेट्रो आणि मोनो यासारख्या सेवा सुरू करताना कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत तरी टोकनची सिस्टिम हद्दपार होण्याचे संकेत आहेत. प्लास्टिकच्या टोकन ऐवजी यापुढे पेपर तिकिट किंवा तंत्रज्ञानावर आधारित तिकिटींगची सिस्टिम वापरात येणार आहे. मोनोरेल तसेच मेट्रो प्रशासनाने त्या अनुषंगानेच तयारी सुरू केली आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही मोनोरेल प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मोनोरेलसाठी क्यु आर टिकिटींग सिस्टिम आणि पेपर सिस्टिमसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदा प्रक्रियेतअंतर्गत डिझाईन, डेव्हलपमेंट, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमिशनिंग यासारख्या कामाचा समावेश आहे. अनलॉकिंगच्या टप्प्यानंतर सुरू होणाऱ्या मोनोरेलसाठीची तिकिट यंत्रणेची तयारी म्हणून मोनोरेलने हा पुढाकार घेतला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुक उपक्रमातील सेवा गेल्या दोन महिन्यांहून अधिक कालावधीसाठी बंद आहे. पण आता मुंबईतील स्थिती पूर्ववत होत असल्यानेच पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतूकीची सुविधा सुरू होण्याचे संकेत आहेत. मोनो आणि मेट्रो सेवा पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आगामी कालावधीत मात्र मोनोरेल आणि बेस्ट उपक्रमाची सेवा सुरू होणे अपेक्षित आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मेट्रो १ या सेवा सुरू करण्यासाठीची तयारी सध्या करत आहे. लॉकडाऊन नंतर या सेवा सुरू होणे अपेक्षित आहे.

मेट्रो १ मार्फतही क्यूआर कोड तिकिट आणि पेपर तिकिट देण्याची सुरूवात होणे अपेक्षित आहे. प्लास्टिक टोकन देण्याएवजी पेपर तिकिटाचा वापर सुरू करण्यासाठी मेट्रो १ ने पुढाकार घेतला आहे. जेव्हा सुरू होतील तेव्हा मेट्रोच्या डब्यांमधील प्रवाशांची संख्यादेखील कमी होणार आहे. लॉकडाऊनआधी सरासरी ४०० लोक एका मेट्रोच्या डब्यातून प्रवास करत होते. तर लॉकडाऊननंतर मात्र एका डब्यात १०० प्रवासी बसतील. तर ७५ जणांनाच उभे राहून प्रवास करण्याची  मुभा असेल. मुंबईत मान्सूनच्या हजेरीला सुरूवात झाली असल्यानेच आता मेट्रो आणि मोनोरेलकडूनही सध्या मान्सूनपूर्व कामांची पुर्तता करण्यात येत आहे.

First Published on: June 14, 2020 9:09 PM
Exit mobile version