पेंग्विनपेक्षा मुंबईतल्या माणसांची काळजी करा – नितेश राणे

पेंग्विनपेक्षा मुंबईतल्या माणसांची काळजी करा – नितेश राणे

मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेवरुन आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. आहे. ‘पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा’ अशी खोचक टीका नितेश यांनी ट्वीटद्वारे केली आहे. ‘पेंग्विनना गोंजारत बसण्यापेक्षा आणि नाइट लाइफसाठी आवाज उठवण्यापेक्षा शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका शहरातील खरे जीव का नाही वाचवत?’, असा सवाल नितेश यांनी ट्वीटद्वारे विचारला आहे. ‘या घटनेनंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु होईल आणि ब्रीज ऑडिटवर चर्चा होईल. मात्र, याचा परिणाम काहीच होणार नाही’, असंही नितेश यांनी म्हटलं आहे.

सीएसएमटी पुलाच्या दुर्घटनेला मुंबई महापालिका जबाबदार आहे का रेल्वे ? यावरुवन आरोप-प्रत्यारोप होत असताना, नितेश राणे यांनी महापालिका आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टार्गेट केलं आहे.

‘मुंबई ही सर्वात श्रीमंत महापालिका असूनही तिला लोकांच्या जीवाची काही किंमत नाही. आता काही अधिकाऱ्यांना निलंबित करतील किंवा त्यांना टार्गेट करतील आणि कमला मिल्स, एल्फिन्स्टन पूल आणि घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रमाणे याहीप्रकरणात चौकशी बसवली जाईल’, असं म्हणत नितेश यांनी शिवसेना आणि महापालिकेला टोला हाणला आहे.

काल संध्याकाळी झालेल्या या दुर्घटनेमध्ये अपूर्वा प्रभू (३५) आणि रंजना तांबे (४०), झाहिद शिराज खान (३२), सारिका कुलकर्णी (३५), तापेंद्र सिंह (३५) आणि मोहन कायगुडे (५८) आदींचा दुर्देवी अंत झाला. तर, ३४ लोकं जखमी झाले. दरम्यान, हा पूल पडल्याने दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर संरचनात्मक तपासणीत कसूर झाली असल्यास दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे.

First Published on: March 15, 2019 9:03 AM
Exit mobile version