सुशांतच्या बँक खात्यात आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही!

सुशांतच्या बँक खात्यात आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही!

सुशांत सिंग राजपूत याच्या बँक खात्याची माहिती काढण्यात आली असून त्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे अद्याप मुंबई पोलिसांच्या तपासात उघडकीस आलेले नाही. याप्रकरणी त्याच्या सीएची पोलिसांनी चौकशी केली असून त्यानेही अशा कुठल्या गैरव्यवहाराची माहिती दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान सुशांतच्या बहिणीसह इतर कुटुंबियांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. सुशांतच्या वडिलांनी राजीवनगर पोलीस ठाण्यात रियाविरुद्ध तक्रार केली असली तरी त्यांनी वांद्रे पोलिसांकडे अशी कोणतीही तक्रार का केली नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. १४ जूनला सुशांतने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्येची सध्या वांद्रे पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

दहा दिवसांपूर्वीच सुशांतची बहिण रितू सिंग हिला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. मात्र समन्स पाठवूनही ती अद्याप चौकशीसाठी हजर राहिलेली नाही. तिच्याशी संपर्क सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्या जबाबातून बरीच माहिती उजेडात येण्याची माहिती वर्तविली जात आहे. सुशांत हा रितूच्या नेहमीच संपर्कात होता.

दुसरीकडे सुशांतच्या बँक खात्याची सविस्तर माहिती काढण्यात आली असून त्यात संशयास्पद व्यवहार झाल्याची कुठेही नोंद दिसून आली नाही. त्याच्या सीएचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला असून त्यांनीही सुशांतच्या आर्थिक व्यवहाराबाबत काहीही शंका उपस्थित केलेली नाही. त्यामुळे सुशांतच्या पैशांचा रिया चक्रवर्तीने अपहार करुन फसवणूक केली याबाबत आताच सांगणे उचित नाही. या दोघांमध्ये काही प्रोजेक्टमध्ये काम सुरु होते, त्यात सुशांतने पैसे गुंतविल्याचे त्यांच्या जबाबातून उघड झाले होते. सुशांतचे वडिल कृष्ण किशोर सिंह यांनी बिहारच्या पटना शहरातील राजीवनगर पोलीस ठाण्यात रिया चक्रवर्तीविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर रियाविरुद्ध अपहार, फसवणुकीसह इतर भादंवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांच्या तपासाकामी बिहार पोलिसांचे चारजणांचे एक विशेष पथक सध्या मुंबईत आले आहे. या गुन्ह्यांचा तपास संबंधित पोलिसांनी सुरु केला असून त्यासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे त्यांना सहकार्य मिळत आहे. या पथकामध्ये दोन पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. हा गुन्हा राजीवनगर पोलीस ठाण्यातून लवकरच मुंबईत वर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र याबाबत पोलिसांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला आहे. आमचा स्वतंत्र तपास सुरु असून मुंबई पोलिसांचे आम्हाला सहकार्य मिळत आहेत. आमचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचेही तपास अधिकारी कैसर आलम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

First Published on: July 30, 2020 6:32 PM
Exit mobile version