महापरिनिर्वाण दिन; यंदा चैत्यभूमीवर आले नाहीत अनुयायी

महापरिनिर्वाण दिन; यंदा चैत्यभूमीवर आले नाहीत अनुयायी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो. मात्र, यंदा खबरदारीची योजना म्हणून कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावू नये यासाठी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी करण्यात आले. या आवाहनाला अनुयायांनी संपूर्ण सहकार्य केल्याचे दिसून येत असून चैत्यभूमीवर नागरिक आलेले नसल्याचे पाहावयास मिळत आहे.

आज सकाळी किशोरी पेडणेकर यांनी महिती पुस्तिकेचे केले प्रकाशन

भारतरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन रविवार, दिनांक ६ डिसेंबर, २०२० रोजी आहे. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या कार्याची तसेच महापरिनिर्वाण दिन तयारी बाबतची माहिती देणारी पुस्तिका महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने संकलित केली आहे. या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईच्‍या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते चैत्यभूमी लगतच्या नियंत्रण कक्षात शनिवारी सकाळी करण्यात आले. याप्रसंगी आमदार यामिनी यशवंत जाधव, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर, नगरसेवक अमेय घोले, उपायुक्त (परिमंडळ २) विजय बालमवार, जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेचा आमदारांनी अनुयायांचे मानले आभार

दरवर्षी ५ डिसेंबरला देखील अनुयायांची चैत्यभूमीवर दर्शनासाठी रिघ असते. यंदा ती रिघ, अनुयायी दिसत नाही. अनुयायांचे हे सहकार्य उद्या ६ डिसेंबर रोजी देखील अपेक्षित आहे, असे आवाहनही महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. यंदा कोरोनामुळे अनुयायांनी येऊ नये, यासाठी वेळीच करण्यात करण्यात आलेले आवाहन आणि देण्यात आलेल्या सूचना यांचा योग्य परिणाम दिसून येतो आहे. या सुचनांचे पालन अनुयायी करत असल्याचे शिवसेना आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी सांगत अनुयायांचे आभारही मानले.

ऑनलाईन पद्धतीने अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करता येणार

दरम्यान, प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना उद्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करता यावे, यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना आणि पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसेच दुपारी १२.५० वाजता दर १० मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या मुंबई केंद्राद्वारे देण्यात आली आहे. सोबत, महापरिनिर्वाण दिनी सोशल मीडियावरून ऑनलाईन थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी पुढीलप्रमाणे लिंक उपलब्ध आहेत.

यूट्यूब लिंक –  bit.ly/abhivadan2020yt 
फेसबूक लिंक –  bit.ly/abhivadan2020fb
ट्विटर लिंक – bit.ly/abhivadan2020tt


हेही वाचा – यंदा चैत्यभूमीवर स्टॉल लागणार नाही


 

First Published on: December 5, 2020 6:17 PM
Exit mobile version