आता ‘वन रुम किचन’च्या घरात रुग्णांचे क्वारंटाईन नाही

आता ‘वन रुम किचन’च्या घरात रुग्णांचे क्वारंटाईन नाही

मुंबई महानगरपालिका

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असली तरी इमारतींसह मोठ्या सोसायट्यांमध्ये कोरेानाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे झोपडपट्टीत प्रत्येक घरापर्यंत जाऊन महापालिकेचे अधिकारी तपासणी करून रुग्णाला कोविडच्या उपचार केंद्रात दाखल करायचे. त्याचप्रमाणे आता इमारतीतील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून रुग्णांना उपचार केंद्रात दाखल करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. आतापर्यंत लक्षणे नसलेल्या पण पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला इमारतीतील घरात स्वतंत्र खोलीत राहण्याची परवानगी दिली जायची. परंतु, यापुढे वन रुम किचनच्या घरात असलेल्या रुग्णाला थेट उपचार केंद्रातच हलवले जाणार आहे.

इमारतीतील प्रत्येक घरापर्यंत पोहोचली महापालिका

मुंबईतील इमारतींसह सोसायट्यांमध्ये आता कोरोनाबाधित रुग्णांचा जोर वाढू लागला आहे. मात्र,आजवर इमारतीतील लक्षणे नसलेले पॉझिटिव्ह रुग्ण घरातील एका खोलीत राहायचे. त्यामुळे होम क्वारंटाईन असलेल्या संकल्पनेत आता थोडा बदल करत यापुढे वन रुम किचनच्या घरात असलेल्या बाधित रुग्णाला लक्षणे नसली तरी त्याला होम क्वारंटाईन करण्याकडे भर दिला जाणार नाही. रुग्ण स्वत: जरी आपली काळजी घेत असला तरी प्रसाधनगृहाचा वापर तो करणार आणि त्यांच्या घरातील कुटुंब सदस्यही. त्यामुळे ज्यांचे टू रुम किचन असतील, त्यांनाच आता होम क्वारंटाईन राहता येणार आहे. मलबारहिल, मुंबई सेंट्रल आदी भागांमध्ये लक्षणे नसलेले कोरोनाबाधित रुग्ण घरीच क्वारंटाईन राहून स्वत:ची काळजी घेत होते. मात्र, सुरुवातीला क्वांरटाईनची क्षमताही आणि उपलब्धता कमी असल्याने महापालिकेकडून इमारतीतील लोकांना होम क्वारंटाईन केले जायचे आणि झोपडपट्टी, चाळींमधील लोकांना महापालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणात अर्थाक क्वारंटाईन सेंटरमध्ये हलवले जायचे.

महापालिकेच्या माध्यमातून यापूर्वी झोपडपट्टी परिसरांमध्ये जाऊन बाधित रुग्णांना क्वारंटाईन केले जायचे. परंतु, आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इमारतींमध्ये आढळून येणाऱ्या प्रत्येक घरातील आणि त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेऊनच पुढील कार्यवाही करावी लागत आहे.


हेही वाचा – अकरावी ऑनलाईन अ‍ॅडमिशन : ‘या’ तारखेपासून करता येणार ऑनलाईन सराव


 

First Published on: July 15, 2020 3:50 PM
Exit mobile version