ना सुरक्षा, ना प्रोटोकॉल; देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांनी रथही ओढला

ना सुरक्षा, ना प्रोटोकॉल; देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांनी रथही ओढला

CM Eknath Shinde News | ठाणे – धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित श्री अंबे माँ चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवारी रात्री ठाण्यात देवीच्या भव्य आगमन मिरवणुक काढण्यात आली होती. या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहभागी होत नागरिकांशी संवाद साधला. तसेच यानिमित्ताने त्यांनी देवीचा रथही ओढला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि आनंदात चैत्र नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला देवीचे उत्साहात आणि आनंदात आगमन झाले. यावेळी टाळ मृदुंग घेतलेले वारकरी, कोळीनृत्यावर ताल धरणारे कोळी बांधव, भरतनाट्यम सादर करणाऱ्या मुलींचा चमू, लेझीम पथक, दाक्षिणात्य वाद्य वाजवणारे कलावंत, कथकली नृत्य सादर करणारे कलाकार, पारंपरिक काठ्या, तलवारी, दानपट्टे याद्वारे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करणारे तरुण तरुणी, मोठमोठे मुखवटे धारण केलेल्या मुर्त्या, पंजाबी, राजस्थानी, मारवाडी नृत्य सादर करणारे कलाकार असे नानाविध प्रकारचे कलावंत यंदा या आगमन मिरवणुकीचे आकर्षक वाढविण्यासाठी यात सहभागी झाले होते. या सगळ्यांचा उत्साह वाढवून त्यांच्या कलेला दाद देत मुख्यमंत्री शिंदे यांनी या कलाकारांसोबत छायाचित्रे काढली.

जनतेतील मुख्यमंत्री ही ओळख कायम ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरक्षा आणि प्रोटोकॉलची तमा न बाळगता या स्वागत मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठांसोबत हितगुज केले तर तरुणाईसोबत मनसोक्त सेल्फी देखील घेतल्या. तर लहानग्या मुलांना हस्तांदोलन करत या मिरवणुकीत त्यांचाही उत्साह त्यांनी वाढवला. यावेळी खास कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील तंदूर वडापावही खाऊन त्याचाही आस्वाद घेतला. एवढंच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना खास आग्रह करत त्यांनाही तो खाऊ घातला.

चैत्र नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला वाजत गाजत देवीची मिरवणूक काढून देवीला मंडपात आणले गेले. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे आणि त्यांची सून वृषाली श्रीकांत शिंदे यांनी देवीचे विधीपूर्वक पूजन केले. बुधवारी चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते देवीचे पूजन करून तिची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. ठाणे पूर्वेकडील तुकाराम मैदानात या जय अंबे माँ चैत्र नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पुढील नऊ दिवस येथे अनेक सांगीतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या पार पडलेल्या या आगमन मिरवणुकीवेळी शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक राम रेपाळे, विभागप्रमुख एकनाथ भोईर, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेवक पवन कदम, माजी परिवहन सभापती विलास जोशी तसेच शिवसेनेचे ठाण्यातील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि मंडळाचे असंख्य कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.

First Published on: March 22, 2023 7:54 AM
Exit mobile version