उत्तर मुंबई – काय आहेत इथल्या मतदारांच्या समस्या?

उत्तर मुंबई – काय आहेत इथल्या मतदारांच्या समस्या?

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ संमिश्र असा आहे. शहरातील लोकसंख्या कमी होऊन उत्तरेच्या दिशेला वाढू लागला आहे. त्यामुळे मालाड पश्चिम ते दहिसर चेकनाक्यापर्यंत पसरलेल्या मतदार संघातील सर्वांत मोठी समस्या असेल तरी ती म्हणजे वाढती झोपडपट्टी. वन जमिनीसह जिल्हाधिकारी यांच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात झोपड्या असल्याने त्यांचा पुनर्विकासाचाच प्रमुख मुद्दा आहे. त्यामुळे वन विभाग आणि जिल्हाधिकार्यांकडून परवानगी मिळाल्यास या भागातील झोपड्यांचा पुनर्विकासाचा मार्ग खुला होऊ शकतो.

मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी परिसर

मोठ्या प्रमाणात पसरलेल्या दहिसरमधील गणपत पाटील नगर, बोरीवलीतील संजय गांधी उद्यानातील झोपडपट्टी, कांदिवली पूर्व येथील दामू नगर, हनुमान नगर, मालाड मालवणी आदी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टींचे विभाग वन व जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली येतात आहे.


डोक्याला शॉट! – वाचा इलेक्शनचे धम्माल कॉमेडी किस्से!


फेरीबोटची समस्या अजूनही कायम

या मतदार संघात गोराई, मार्वे मनोरी असे कोळीवाडे तसेच गावठाणांचा मुद्दाही तेवढाच गंभीर आहे. कोळीवाड्यांचा विकास हाही प्रमुख मुद्दा आहे. आजही गोराई आणि मनोरीला फेरीबोटीने जाण्याशिवाय पर्याय नाही. गोराईला बोरीवलीतून फेरीबोटीने जाता येते. आणि रस्ते मार्गी जायचे असेल तर भाईंदर उत्तनमार्गे जावे लागते. त्यामुळे बोरीवली आणि गोराईदरम्यान आणि मालाड मार्वे येथे खाडीवर पूल बांधल्यास खाडी पलीकडे राहणाऱ्या गावांचा संपर्क जलद होईल तसेच अडचणींच्यावेळी त्यांना आरोग्य सेवा सुविधांचाही लाभ मिळेल. त्यामुळे दोन्ही ठिकाणी खाडीपूल तसेच दोन्ही ठिकाणच्या गावांमध्ये सुसज्ज असे रुग्णालय आणि प्रसुतीगृह बांधण्याची प्रमुख मागणी होत आहे. आजवर अनेक खासदार झाले, पण त्यांना या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असंच चित्र सध्या दिसत आहे.

डिम्ड कन्व्हेयन्सचं काय झालं?

या भागातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या भोगवटा प्रमाणपत्र तसेच डिम्ड कन्व्हेयन्स हेही मुद्दे असून मागील अनेक वर्षांपासून या मुद्दयांवर सकारात्मक निर्णय होऊन नागरिकांना लाभ मिळाल्याचे प्रमाण अल्प आहे.

First Published on: April 13, 2019 4:41 PM
Exit mobile version