एक हजार ग्रामस्थांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा

एक हजार ग्रामस्थांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा

केडीएमसी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने नागरिकांच्या प्रवासाकरता रिंगरुट सेवेचा आराखडा तयार केला असून यामध्ये किमान एक हजार नागरिकांना घरे खाली करण्यासाठी प्रशासनाने नोटीस बजावल्याने मांडा-टिटवाळा सहित अटाळी,आंबिवली परिसरात राहत असणारे नागरिक हवालदील झाले आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने हा प्रस्ताव प्रशासनाला सादर केला आहे. लोकप्रतिनिधीच्या आग्रहास्तव या प्रस्तावाला गती मिळाली आहे. अटाळीत किमान 590 नागरिक राहत असणार्‍या परिवाराला याचा जबर फटका बसला असून मांडा-टिटवाळ्यातील किमान चारशे नागरिक यामुळे बाधित होऊन विस्थापित होणार आहेत.

यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी वसाहतीत व रिंगरूटच्या आडव्या येत असणार्‍या घरांना घर खाली करण्याकरता नोटीस बजावली आहे. रिंगरूटच्या दरम्यान एफएसआय मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून बाधित होणार्‍या व विस्थापितांना महापालिका प्रशासन पर्याय म्हणून जागा किंवा बदल्यात नवीन घर घेण्याकरता रुपये मोजणार असल्याचे अ प्रभाग क्षेत्राचे प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांनी सांगितले. मात्र, याच दरम्यान येथील चाळी रस्त्यालगत असून अनधिकृत बांधकाम करणार्‍या मालकाच्या नावे जर सातबारा उतारा असेल तर त्याला देखील याचा मोबदला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

First Published on: December 3, 2019 2:24 AM
Exit mobile version