आता बस आगार आणि महत्वाच्या रस्त्यांवरही जंतूनाशकाची फवारणी

आता बस आगार आणि महत्वाच्या रस्त्यांवरही जंतूनाशकाची फवारणी

जंतूनाशक फवारणी

मुंबईत ‘करोना’चा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज असून एका बाजूला वैद्यकीय उपचार आणि जनजागृतीच्या माध्यमातून हा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला जात असतानाच दुसरीकडे जंतूनाशक फवारणी करत या संसर्गांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने आता बस आगार आणि काही रहदारीच्या प्रमुख रस्त्यांचेही निजंर्तुंकीकरण केले जात आहे. अग्निशमन दलाच्यावतीने आज जेव्हीपीडी १० वा रस्ता, जुहू-वर्सोवा लिंक रोड ते जुहू चौक, एस. व्ही. रोड मिलन सब-वे ते जोगेश्वरी, मुंबई सेंट्रल बस आगार, मजास बस आगार, मालवणी बस आगार आदी ठिकाणी सोडियम क्लोराईड पाण्यात मिसळून त्याद्वारे फवारणी केली. अग्निशमन दलाने दिवसभरात १९ प्रमुख रस्ते, बस आगार निश्चित केले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात चार ठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्यात आलेली आहे.

या परिसरात केली फवारणी

मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने ई. एस. पाटणकर मार्ग, राणीबाग अणि दारुखाना, बाळासाहेब हिरे मार्ग, मलबारहिल, चार्मिक हिल रोड, एम. एल. डहाणुकर मार्ग, वांद्रे पूर्व अनंत काणेकर मार्ग, मदनपुरा, तुलीप स्टार हॉटेल परिसरातील रस्ते, जुहू गुलमोहर रस्ते, एन. एस. फडके मार्ग उड्डाणपुल ते गोल्डन लोटस आदी परिसरातही फवारणींचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा – CoronaVirus: सांगलीत आढळले आणखी १२ करोना पॉझिटिव्ह; राज्यात एकूण १४७ रुग्ण

मुंबई अग्निशमन दलाकडे सध्या ११ हजार ८० लिटर एवढा सोडियम हायपोक्लोराईडचा साठा असून हा पाण्यात मिसळल्यानंतर हे प्रमाण ५ लाख ५४ लाख लिटर एवढे होवू शकते. त्यामुळे सध्या पुरेसा रासायनिक द्रव्याचा साठा असून याच्या फवारणीमुळे या विषाणुंच्या संसर्गाचे प्रमाण कमी होते, असे तज्ज्ञांचे मत असल्याचे उपायुक्त आणि मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी स्पष्ट केले.

मशीन्सच्या सहाय्याने जंतूनाशक फवारणी 

मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने सध्या क्विक रिस्पॉन्स व्हेहिकल, मिस्ट ब्लोवींग मशीन आणि बॅक पॅक बॅटरी ऑपरेटेड स्पेयींग मशीन आदींच्या माध्यमातून ही जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे. प्रमुख रस्त्यांबरोबरच आता झोपडपट्टी परिसरांमध्येही अशा प्रकारची फवारणी केली जाणार असल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले.

First Published on: March 27, 2020 6:46 PM
Exit mobile version