आता ‘कमल सखी संवाद’च्या माध्यमातून भाजपा साधणार महिलांशी संवाद

आता ‘कमल सखी संवाद’च्या माध्यमातून भाजपा साधणार महिलांशी संवाद

महाजनादेश यात्रेतून मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा भाजपाचा मानस असून आता महिलांच्या मतांकडेदेखील भाजपाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे आता ‘कमल सखी संवाद’ यात्रेतून भजापा राज्यातील महिलांशी संवाद साधणार आहे. भाजपा महिला मोर्च्याच्यावतीने या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गणपती झाल्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

असा असेल कमल सखी संवाद 

सध्या महिला सर्वच स्तरावर अग्रभागी असून, या कमल सखी संवादातून प्रत्येक स्तरातील महिलेशी संवाद साधून त्यांनी दिलेल्या माहितीचा विचार केला जाईल, तसेच त्यांच्या समस्यांही यातून कळतील जेणेकरून सरकारला यापुढे जाऊन महिलांबाबत अधिक वेगाने काम करता येणार आहे, असे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः राज्यातील प्रत्येक मतदारसंघात हा कार्यक्रम राबवला जाणार असून या कार्यक्रमाला त्या त्या विभागातील आमदार, खासदार देखील उपस्थित राहणार आहेत. विशेष बाब म्हणजे कमल सखी संवादच्या माध्यमातून महिलांकडून आलेल्या सर्व सूचना या जेव्हा विधानसभा निवडणुकीसाठी जो भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध होईल. त्यामध्ये मांडल्या जाणार आहेत. विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवत मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि पनवेल सारख्या मोठ्या शहरात राहणाऱ्या विविध भागांतील ग्रामीण महिलांना या कमल सखी संवादच्या माध्यमातून जोडले जाणार आहे.

कमल सखी संवाद कार्यक्रमामध्ये घरकाम करणाऱ्या ते नोकरी करणाऱ्या प्रत्येक महिलेचा समावेश असणार असून, या सर्व महिलांच्या समस्या जाणून घेणार आहोत. तसेच या महिलांचे सर्व विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या पर्यंत पोहोचवणार आहोत.

– माधवी नाईक, अध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा

निवडणूक लढण्यास इच्छुक महिलांचे अर्ज घेणार 

दरम्यान, यावेळी जर कुणी महिला निवडणूक लढण्यास इच्छुक असेल तसेच तिचे तिच्या मतदारसंघातील काम आणि पक्षासाठी दिलेले योगदान याचा विचार करून अशा इच्छुक महिलांचे अर्ज घेण्यात येणार असून, हे अर्ज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहेत.

First Published on: August 27, 2019 6:19 PM
Exit mobile version