Reopen School In Mumbai : ‘ओमीक्राँन’मुळे मुंबईतील शाळा १५ डिसेंबरला उघडणार

Reopen School In Mumbai : ‘ओमीक्राँन’मुळे मुंबईतील शाळा १५ डिसेंबरला उघडणार

‘ओमीक्रॉंन’ या कोरोनाच्या नवीन विषाणूच्या दहशतीमुळे धास्तावलेले मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबई हद्दीतील इयत्ता १ ली ते ७ वी च्या शाळा आता १ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईसह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला परतावून लावल्यानंतर कोरोनावर चांगले नियंत्रण आले. तिसऱ्या लाटेलाही आरोग्य यंत्रणेने थोपवून धरले होते. त्यामुळे राज्य सरकारने इयत्ता १ ली ते ७ वी च्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

त्याअनुषंगाने राज्यात पूर्व तयारी सुरू झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचा नवीन प्रकार असलेल्या ‘ओमीक्रॉंन’ या विषाणूने दक्षिण आफ्रिका व काही युरोपियन देशांत डोके वर काढले. या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत दक्षिण आफ्रिका व युरोपियन देशांमधून भारतासह जगातील अन्य देशात हजारो नागरिक,पर्यटकांनी ये- जा केली असल्याने अवघे जग धास्तावले आहे. त्यामुळे राज्य सरकार व मुंबई महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे.

मात्र या सर्व परिस्थितीपासून कालपर्यंत बेखबर असलेल्या राज्यातील आघाडी सरकारने इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. मात्र आता राज्य सरकार, मुंबई महापालिका प्रशासन हादरले आहे. तसेच, मुंबईसह राज्यातील सरकारी, पालिका, खासगी शाळांनी शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत जोरदार पूर्व तयारी सुरू केली होती. मात्र आता कोरोनाच्या नवीन विषाणू असलेल्या ‘ओमीक्रॉंन’ ने डोके वर काढल्याने मुंबई महापालिका प्रशासन, खासगी शैक्षणिक संस्था या कालपर्यंत संभ्रमा अवस्थेत होत्या. तसेच, विद्यार्थ्यांचे अद्याप लसीकरण झालेले नसताना शाळा सुरू होत असल्याने पालकही काहीसे चिंतातुर झाले होते.

दरम्यान, मंगळवारी सकाळी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, पालिका शिक्षण खात्याचे अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत, मुंबई महापालिका हद्दीतील इयत्ता १ ली ते ७ वी च्या शाळा १ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत गेल्या १० दिवसांत विदेशातून आलेल्या नागरिकांचा, पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे. आता १५ डिसेंबरला शाळा सुरू होणार असल्याने तोपर्यंत पालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणेला कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाला आहे की नाही याबाबत आढावा घेण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे.

‘ओमीक्रॉंन’च्या धोक्यामुळे १५ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार – इकबाल चहल 

दक्षिण आफ्रिकेत ‘ओमीक्रॉंन’ विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. तेथे ‘ओमीक्रॉंन’ बाधित रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील मुलांची संख्या जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे मुलांची काळजी घेण्याच्या दृष्टीने आपण इयत्ता १ ली ते ७ वी च्या शाळा १ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.


Farmers Protest: आंदोलक शेतकर्‍यांच्या घरवापसीच्या चर्चांवर राकेश टिकैत यांचे मोठं विधान, केला ‘हा’ दावा

First Published on: November 30, 2021 1:22 PM
Exit mobile version