राज्‍यातील शासकीय वैद्यकिय महाविदयालयाच्या डॉक्‍टर्सचे एकदिवस काम बंद आंदोलन

राज्‍यातील शासकीय वैद्यकिय महाविदयालयाच्या डॉक्‍टर्सचे एकदिवस काम बंद आंदोलन

‘राज्‍य शासकीय वैदयकिय महाविदयालय आणि रूग्‍णालयातील वैदयकिय अधिकाऱ्यांनी आपल्‍या मागण्यांसाठी ७ एप्रिलपासून काळया फिती लावून काम सुरू केले आहे. मात्र, शासनाने तातडीने मागण्या मान्य न केल्यामुळे राज्‍यातील सर्व शासकीय वैदयकिय महाविदयालयात आज २४ तास काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील जे.जे.रूग्‍णालय येथे संघटनेकडून आंदोलन करण्यात येत असून त्‍याउपरही शासन मागण्या मान्य करणार नसेल तर नाईलाजास्‍तव २२ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागेल’, असा इशारा वैदयकिय महाविदयालय वैदयकिय अधिकारी संघटनेने दिला आहे. तसेच हे कामबंद आंदोलन करताना आम्‍हाला कुठल्‍याही रूग्‍णाला किंवा प्रशासनाला वेठीला धरायचे नसून आमच्या मागण्यांची सातत्‍याने होणारी हेळसांड पाहूनच अतिशय नैराश्यातून आम्‍हाला हे पाऊल उचलावे लागत असल्‍याचे संघटनेचे म्‍हणणे आहे.

या आहेत डॉक्टरांच्या मागण्या

शासकीय वैदयकिय महाविदयालय आणि रूग्‍णालयातील वैदयकिय अधिकारी हे महत्‍वाचे पद असते. हे डॉक्‍टर्स कोरोना काळात एकही दिवसाची सुट्टी न घेता किंवा क्‍वारंटाईन लीव्हही न घेता सलग २४ तास काम करत आहेत. शासकीय रूग्‍णालयातील सर्वच महत्‍वाच्या जबाबदाऱ्या या डॉक्‍टर्सना पार पाडाव्या लागत आहेत. त्‍यातील अनेकांना कोरोनाची लागणही झाली. मात्र, उपचार घेउन असे डॉक्‍टर्स तात्‍काळ रूजूही झाले आहेत. सरकारी मेडिकल कॉलेजमधील वैदयकिय अधिकाऱ्यांना कायमस्‍वरूपी करण्यात यावे आणि त्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या त्‍यांच्या मागण्या आहेत. तसेच हे पद मंजूर आणि कायमस्‍वरूपीच असल्‍याने या निर्णयाचा शासनावर कोणताही आर्थिक भारही पडणार नाही, असे संघटनेचे म्‍हणणे आहे.

ऑक्‍टोबर २०२० मध्येही संघटनेने आंदोलन पुकारले होते. तेव्हा शासनाकडून ज्‍यांची दोन वर्षे सेवा झाली आहे, त्‍यांना कायमस्‍वरूपी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्‍याबाबत पुढे कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे मागण्या मान्य न झाल्‍यास बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.


हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी सूचना! विशेष गाड्या धावणार तर काही रद्द; जाणून घ्या तुमच्या ट्रेनचे स्टेटस


 

First Published on: April 15, 2021 11:33 AM
Exit mobile version