मुंबईत करोनाचा आणखी एक संशयित, रुग्णांची संख्या ४

मुंबईत करोनाचा आणखी एक संशयित, रुग्णांची संख्या ४

करोना व्हायरस

चीनमध्ये पसरलेल्या करोना व्हायरसचा धोका भारतातही वाढू लागला आहे. चीनहून मुंबईत स्थलांतरीत झालेल्या तीन संशयित रुग्णांची नोंद झाल्यानंतर सोमवारी आणखी एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णावर ही मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सोमवारी समोर आलेल्या रुग्णाच्या माहितीनुसार आता करोना व्हायरसच्या संशयित रुग्णांची संख्या चार झाली आहे. तारडेव येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय अभिषेक बाफना या व्यक्तीची संशयित रुग्ण म्हणून नोंद करण्यात आली आहे.
या व्यक्तीला गेले पाच दिवस सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसत होती. तर, कालपासून तापाची लक्षणं आढळून आली आहेत. ही व्यक्ती काहीच दिवसांपूर्वी चीनहून परतल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ३ ते ११ जानेवारी या दरम्यान अभिषेक चीन दौऱ्यावर होता आणि ११ तारखेला तो मुंबईत परतला.

अभिषेक चीनमध्ये असताना त्याचा संपर्क एका रुग्णाशी आला. ज्याला सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणं होती. त्यामुळे, त्याची नोंद मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये एक संशयित रुग्ण म्हणून करण्यात आली आहे. दरम्यान आता रुग्णाची प्रकृती चांगली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

रुग्णांच्या सर्व चाचण्या नेगेटिव्ह –

आतापर्यंत तीन रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. या तिन्ही रुग्णांच्या आरोग्याचा अहवाल नेगेटिव्ह आले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली आहे.

First Published on: January 27, 2020 3:37 PM
Exit mobile version