Corona: मुंबईत अग्निशमन दलाच्या आणखी एका जवानाचा मृत्यू

Corona: मुंबईत अग्निशमन दलाच्या आणखी एका जवानाचा मृत्यू

कोरोना विषाणूची बाधा झाल्याने मुंबई महापालिकेच्या दहा ते बारा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला असतानाच अग्निशमन दलाच्या आणखी एका जवानाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गोरेगाव येथील अग्निशमन केंद्रातील यंत्र चालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबई अग्निशमन दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण ४१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अग्निशमन दलाच्या या यंत्र चालकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू पावलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांची संख्या दोनवर पोहोचली आहे.

मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी कोरोनाच्या प्रारंभ काळात प्रत्येक इमारती, मंडई, कार्यालये आदींचे सॅनिटायझेनच्या कामात महत्वाची भूमिका बजावली आहे. यापूर्वी अग्निशमन दलाचे उपप्रमुख अधिकारी व शाहू नगर अग्निशमन दलाच्या केंद्र अधिकारी यांना कोरोनाची बाधा झाली होती. आतापर्यंत अग्निशमन दलाचे जवान अधिकारी आणि कर्मचारी अशाप्रकारे एकूण ४१ जणांना बाधा झाली आहे. यापैकी २२ जवान, अधिकारी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामधील ४ जणांवर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर लक्षणे नसलेले परंत पॉझिटिव्ह असे १४ जण असून त्यांना कोविड केअर सेंटर दोनमध्ये दाखल केले आहे. तर आतापर्यंत तीन अधिकारी व जवान घरी परतले आहेत.

मुंबई महापालिकेच्याही विविध विभागातील अनेक कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे. एकट्या मुंबई महापालिका मुख्यालयात आपत्कालीन विभागाचे १४ हून अधिक व सुरक्षा खात्याचे १२ ते १५ कर्मचारी तसेच अन्य विभागांचे अशाप्रकारे कोरोना बाधितांची संख्या ४० ते ४५च्या घरात पोहोचली आहे. याशिवाय २४ विभाग कार्यालये आणि खात्यांममधील कर्मचारीही मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत. यामध्ये सफाई खात्यातील कामगारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.

हेही वाचा –

Coronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १४३८ नवे रुग्ण, आज ३८ मृत्यू

First Published on: May 28, 2020 10:10 PM
Exit mobile version