ऑनलाईन विवाह नोंदणी २१ जुलैपर्यंत बंद; ऑफलाईन मात्र सुरु

ऑनलाईन विवाह नोंदणी २१ जुलैपर्यंत बंद; ऑफलाईन मात्र सुरु

मुस्लिम पुरुषाने हिंदू महिलेशी केलेला दुसरा विवाह कायद्याने अमान्य, गुवाहाटी कोर्टाचा निर्णय

संगणकीय प्रणाली अद्ययावत करण्यात येत असल्याने २१ जुलैपर्यंत ऑनलाईन विवाह नोंदणी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ऑफलाईन नोंदणी सुरु ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. मुंबई महापालिकेच्या विविध नागरी सेवा-सुविधांविषयीची कार्यवाही गेल्या काही वर्षांपासून संगणकीय प्रणालीद्वारे व ऑनलाईन पद्धतीने अत्यंत सक्षमपणे सातत्याने करण्यात येत आहे. या अनुषंगाने संगणकीय प्रणालीचे अद्ययावतीकरण व सक्षमीकरण गरजेचे असल्याने महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे सध्या याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.

या अद्ययावतीकरणाच्या अंमलबजावणीकरीता संबंधित संगणकीय प्रणालीचे कामकाज २१ जुलैपर्यंत बंद राहणार आहे. महापालिकेच्या काही सेवा-सुविधांविषयीची कार्यवाही अल्प कालावधीसाठी ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने होणारे विवाह नोंदणीचे कामकाजदेखील बंद राहणार असून यामुळे पर्यायी स्वरुपात विवाह नोंदणी विषयक कार्यवाही ही ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

संगणकीय प्रणाली पूर्ववत होईपर्यंत महापालिकेच्या सर्व २४ विभागांमधील विवाह निबंधकाकडे ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील आणि मुलाखतीची तारीख व वेळ देण्यात येईल. विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबंधित संगणकीय प्रणालीच्या अद्ययावतीकरणाचे काम झाल्यानंतर प्रचलित पद्धतीने ऑनलाईन अर्ज केल्यावर प्राप्त होईल. याबाबत अधिक माहितीसाठी विभागातील विवाह निबंधकाकडे संपर्क साधावा आणि महापालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहनही महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आले आहे.

First Published on: July 15, 2021 10:52 PM
Exit mobile version