नव्या वर्षातलं पाचवं अवयवदान! वोक्हार्टमध्ये झाली शस्त्रक्रिया

नव्या वर्षातलं पाचवं अवयवदान! वोक्हार्टमध्ये झाली शस्त्रक्रिया

मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरु शकतो. तर, ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारु शकतो. अशीच एक घटना मंगळवारी मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये घडली असून ब्रेन डेड झालेल्या ७१ वर्षीय व्यक्तीने दोघांना जीवदान दिले आहे. हे मुंबईतील या वर्षातलं पाचवं अवयवदान पार पडलं आहे. वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे, त्यांना आधी जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तिथे त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते. पण, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही, त्यामुळे २१ जानेवारीला त्यांना वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असतानाच त्यांना ब्रेन हॅमरेज झाला आणि डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केलं.

ब्रेनडेड झाल्यानंतर या व्यक्तीच्या कुटुंबाचे समुपदेशन करून अवयवदानाची परवानगी घेण्यात आली आणि कुटुंबाच्या परवानगीनुसार या व्यक्तीचं अवयवदान करण्यात आलं आहे.


बापरे! – पित्ताशयामध्ये १ फूट २ इंचाची गाठ! वोक्हार्टमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

झेडटीसीसीने पार पाडली प्रक्रिया

या अवयवदानाविषयी मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख रवी हिरवाणी म्हणाले, “दहिसर येथे राहणारे जेष्ठ नागरिक बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये २१ जानेवारीला दाखल झाले होते. त्याच दिवशी डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. आम्ही त्यांच्या नातेवाईकांना अवयवदानाविषयी समुपदेशन केल्यावर ते अवयदानासाठी तयार झाले आणि २२ जानेवारीला या व्यक्तीचे दोन्ही मूत्रपिंड वोक्हार्ट हॉस्पिटलमधील एका ३० वर्षीय पुरुषाला दिले. यकृत ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे. अवयवदानाची ही संपूर्ण प्रक्रिया झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर म्हणजेच झेडटीसीसीच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.”

First Published on: January 23, 2019 8:25 PM
Exit mobile version