चालक आणि वाहकांव्यतिरिक्त इतर पदांना मंजुरी नको

चालक आणि वाहकांव्यतिरिक्त इतर पदांना मंजुरी नको

नवी मुंबई महानगरपालिका

महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये जादा पदे निर्माण करून सार्वजनिक निधीचा अपहार केला जात असल्याने चालक आणि वाहकांव्यतिरिक्त इतर पदांना परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी पालिकेच्या कर्मचारी कामगार सेनेच्यावतीने नगरविकास विभागाकडे करण्यात आली आहे. याच अनुषंगाने पालिकेचे शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांनी आयुक्त डॉ. रामास्वामी यांची भेट घेतली आणि परिवहनच्या कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली.

डिसेंबर 2018 मध्ये पालिका प्रशासनाने कर्मचारी भरती संदर्भातील एक प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर कर्मचार्‍यांनी आक्षेप घेतला. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये काही अधिकार्‍यांनी स्वतःसाठी मोठमोठ्या वेतनाची पदे निर्माण केली आहेत. एकीकडे परिवहन उपक्रम मासिक तीन कोटींचा तोटा सहन करत असताना दुसरीकडे पालिकेकडून अनुदान घेऊन अनेक अधिकारी मोठा पगार घेत आहेत, असा आरोप कर्मचारी युनियनने केला आहे. अधीक्षक अभियंता हे पद कोणत्याही परिवहन उपक्रमात अस्तित्वात नाही. मात्र, आपल्याकडे आहे. कार्यालय अधीक्षक ही आठ पदे आहेत. मात्र, इतर परिवहन उपक्रमात यासाठी एक पद आहे. लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, उपलेखापाल, तिकीट रोख अधीक्षक, सहाय्यक तिकीट रोख अधीक्षक ही पदे प्रत्येकी एक आवश्यक असताना प्रत्येकी 2 ते 3 पदांवर बढती देऊन या पदांना गलेलठ्ठ पगार दिला जात आहे, असा आरोप कर्मचारी सेनेच्यावतीने करण्यात आला.

गरज असलेल्या वाहक आणि चालक या पदांनाच मान्यता देण्यात यावी. बेकायदा पदांना मान्यता दिल्यास प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी कामगार सेना आणि शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांनी दिला आहे.यावर मनपा आयुक्त रामास्वामी एन.यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे.

First Published on: February 27, 2019 4:04 AM
Exit mobile version