पूरग्रस्तांचा उद्रेक

पूरग्रस्तांचा उद्रेक

मागील ५ दिवसांपासून सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. सुरुवातीचे तीन दिवस या भागात ना मुख्यमंत्री, ना पालकमंत्री फिरकले, त्यामुळे प्रशासन यंत्रणाही पोहोचली नाही. पूरग्रस्तांना सरकारने वार्‍यावर सोडले होते, माध्यमांमधून जेव्हा विषयी टिकाटिप्पणी होऊ लागली तेव्हा गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी हवाई पाहणी केली, शुक्रवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री सुभाष देशमुख सांगली, कोल्हापुरात अवतरले, मात्र त्यांना पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले. चार दिवस कुठे होतात?, असा थेट सवाल पूरग्रस्तांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना विचारल्यावर मंत्र्यांची पाचावर धारण बसली.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख हे सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना दोन्ही मंत्र्यांना स्थानिकांनी घेरले. तुम्ही चार दिवस कुठे होता? प्रशासनाने मदत पोहोचवण्यास उशीर का केला?, असा थेट सवाल केला. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापुरात महापूर आला. परिणामी हजारो लोक अनेक दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकले आहेत. परंतु अद्याप या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यात प्रशासनाने दिरंगाई केली. तसेच बचावकार्यासाठी बोटींची संख्याही कमी असल्याने हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकून आहेत, असा आरोप करत स्थानिकांनी त्यांना घेरले. तुम्ही यात्रा काढत आहात, तुमची यंत्रणा चुकीची आहे, आम्हाला यांची मदत नको, आम्ही सक्षम आहोत, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही ग्रामस्थांनी दिली.

दरम्यान पूरग्रस्त भागात नागरिकांमध्ये असंतोष पसरला असतानाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा बोटीतून आढावा घेतला. त्यावेळी कार्यकर्त्याने काढलेल्या सेल्फी व्हिडीओला गिरीश महाजन यांनी हसून दाद देताना दिसले. त्यामुळे नागरिकांच्या संताप आणखी वाढ झाली, हे कमी होते म्हणून काय शुक्रवारी राज्य सरकार दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस क्षेत्र पाण्यात बुडाले असेल तरच मोफत अन्नधान्य देणार, असा जीआर सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने 7 ऑगस्ट रोजी जारी केला आहे. एकीकडे लोक पाण्यात असताना, अडचणीत असताना या अटी आणि शर्तींमुळे सरकार राज्यातील पूरग्रस्तांची थट्टा करण्यात धन्यता मानत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

चार दिवस कुठे होता? पूरपिडीतांचा सवाल                                                                                इतके दिवस पूर आहे आज का आला आहात? एवढ्या दिवस कुठे होतात? प्रशासनाची आम्हाला मदत मिळाली नाही, मदत केल्याचा प्रशासनाचा दावा खोटा आहे. आता हे मंत्री येऊन सेल्फी काढून हौस भागवून घेत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

कोल्हापुरातील ५५०० ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली

२९ सब स्टेशनला पाण्याचा वेढा
पुरपरिस्थितीमुळे महावितरणच्या सांगली आणि कोल्हापूर भागातील २९ सबस्टेशन पाण्याखाली गेले आहेत. तर जवळपास ५५०० इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मर पुराच्या पाण्याने वेढले आहेत. जवळपास तीन लाख वीज ग्राहकांना पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे. त्यामध्ये कोल्हापुरातील वीज ग्राहकांची संख्या १ लाख ८० हजार तर सांगली परिसरात १ लाख २५ हजार इतक्या ग्राहकांना पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून पूर परिस्थिती पाहून याठिकाणचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे.

कोल्हापुरातील महापुरात महावितरणच्या यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण विजेच्या यंत्रणेला फटका बसतानाच ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे महावितरणसमोर वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे संकटही वाढले आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतरच आता वीज पुरवठा पूर्ववत होईल असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महावितरणचे २५०० कमर्चारी, अधिकारी याठिकाणी कार्यरत आहेत. आता पुराचे पाणी कमी होण्यासाठीची प्रतिक्षा महावितरणच्या टीमकडून केली जात आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर एका दिवसाच्या आतच कोल्हापूर आणि सांगली परिसरात वीज पुरवठा सुरू करण्याचे उद्दीष्ट महावितरणच्या टीमने ठेवले आहे. याठिकाणी संपुर्ण कर्मचार्‍यांची आणि तंत्रज्ञांची टीम सध्या कार्यरत आहे. आता पाणी ओसरण्याची प्रतिक्षा असल्याचे महावितरणचे संचालक संचलन दिनेश साबू यांनी स्पष्ट केले. ज्याठिकाणी नागरिकांची आश्रयाची व्यवस्था करण्यात आली आहे त्याठिकाणी महावितरणने पिण्याच्या पाण्यासाठी जनरेटरची व्यवस्था केली आहे, असे त्यांनी सांगितले. पुराच्या पाण्यामुळे नेमके किती नुकसान झाले आहे हे यंत्रणा पूर्ववत करतेवेळीच कळेल असेही साबू म्हणाले.

ग्राहकांसाठी हेल्पलाईन

वीज पुरवठ्याशी संबंधित कोणत्याही मदतीसाठी महावितरणकडून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोल्हापूरसाठी 7875769103 हा क्रमांक तर सांगलीसाठी 787575769449 या क्रमांकावर मदत मिळवण्यासाठी डीएसएस कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

महावितरण मोफत वीज मीटर बदलून देणार
राज्यात ज्या ठिकाणी पुरामुळे महावितरणच्या ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त झाले आहेत, अशा वीजग्राहकांचे वीजमीटर स्वखर्चाने बदलून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. राज्यात पुरामुळे अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. अशा ग्राहकांनी संयम बाळगून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरामुळे घरात पाणी साचल्याने ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा ग्राहकांचे वीजमीटर महावितरण स्वखर्चाने बदलून देणार आहे. वीज मीटर बदलण्याचे काम त्या-त्या भागातील पूर परिस्थिती निवळताच करण्यात येईल.

18 हजार हेक्टरवरील शेती उध्वस्त

अतिपावसाने रायगडकरांना रडवले !

अतिपावसामुळे रायगड जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जिल्ह्यातील 1116 गावांमधील 18 हजार 595 हेक्टर क्षेत्रावरील भात शेती, भाजीपाला, आंबा बागायतींचे नुकसान झाले आहे. सुमारे 20 टक्के कृषिक्षेत्र बाधित झाले आहे. अतिपावसाने रायगडकरांना अक्षरश: रडवले आहे.

रायगड जिल्ह्यात 1 लाख 23 हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा 1 लाख 4 हजार हेक्टरवर भात लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले होते. भात लावणीची कामे 100 टक्के पूर्ण झाली होती. चांगला पाऊस पडत असल्यामुळे रोपांची वाढ चांगली होत होती. कुठल्याही रोगाचा प्रदुर्भाव झाला नव्हता. यंदा चांगले उत्पादन मिळेल अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती. परंतु जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापसून पावसाने रायगडला झोडपून काढले. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठड्यातच पावसाने आपली वार्षिक सरासरी ओेलांडली. या अतिपावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे.

पाण्याचा निचरा न झाल्यामुळे खाचरांमध्ये पाणी साचून राहिले. काही ठिकाणी पाण्याच्या झोतामुळे जमीन खरडून गेली. बांध फुटले. उधाणाचे पाणी आले. शेतामध्ये माती भरली. दगड गोटे आले. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यात सार्वाधिक पीक क्षेत्रात नुकसान झाले आहे.

अलमट्टी धरणातून पाण्याचा अपेक्षित विसर्ग नाहीच

सलग तीन दिवस सांगली, कोल्हापुर हे जिल्हे पुराच्या पाण्याने वेढलेले असताना सरकार आणि प्रशासन ढिम्म होते, हा प्रकार माध्यमांनी लावून धरल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवाई पहाणी केली. त्यानंतर सांगली परिसरातील भीषणता लक्षात आल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयूरप्पा यांना फोनवरून अलमट्टी धरणातून ५ लाख क्यूसेस इतका पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीरही केले. प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी शुक्रवारी सकाळपर्यंत अपेक्षित पाण्याचा विसर्ग केलाच नाही, त्यामुळे सांगलीतील पुराची परिस्थिती शुक्रवारीही जैसे थे होती. अशा प्रकारे येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.

कृष्णा भाग्य जल निगम लिमिटेडच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार, शुक्रवारी सकाळी 10 वाजता आलमट्टी धरणात 3 लाख 49 हजार 526 क्युसेक पाण्याची आवक सुरु होती आणि 3 लाख 64 हजार 52 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. म्हणजेच जेवढे पाणी धरणात आले, जवळपास तेवढ्याच पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे सांगलीमधील परिस्थिती जैसे थेच राहिली. सांगलीतील पूर ओसरण्यासाठी आणखी जास्त पाण्याचा विसर्ग होण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 5 लाख क्युसेक पाणी विसर्ग करण्याची विनंती कर्नाटक सरकारला केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने आलमट्टी धरणातून साडेचार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याचा दावाही केला.

सरकारचा खुलासा
अलमट्टी धरणातून कर्नाटक सरकारने शुक्रवारी दुपारपर्यंत ४,५०,००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला, असा खुलासा करत शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी राज्यात पूरपरिस्थिती असताना जनतेला दिलासा देणे सोडून चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात येत असून विरोधकांकडून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे म्हटले.

First Published on: August 10, 2019 5:30 AM
Exit mobile version