पालघर लिंचिंग प्रकरण भोवलं, अखेर ‘त्या’ पोलीस अधिक्षकांची बदली!

पालघर लिंचिंग प्रकरण भोवलं, अखेर ‘त्या’ पोलीस अधिक्षकांची बदली!

हत्या करण्यात आलेले साधू

दोन महिन्यांपूर्वी पालघरमध्ये दोन साधूंसह तिघांची जमावाने संशयातून निर्घृण मारहाण करत हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात निषेधाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. या प्रकरणानंतर पालघरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र आज अखेर त्यांची बदली करण्याचे आदेश गृह विभागाने काढले आहेत. त्यांच्या जागेवर दत्तात्रय शिंदे यांची पालघरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, विशेष बाब म्हणजे, गौरव सिंग यांना अद्याप कुठेही पोस्टिंग देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या बाबतीत आता प्रशासन काय निर्णय घेणार? हा इथल्या स्थानिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

दत्तात्रय शिंदे, पालघरचे नवे पोलीस अधीक्षक

गडचिंचलेचमध्ये या तिघा जणांची हत्या झाली होती. यावेळी मुलांना पळवून नेणारे भामटे असल्याच्या संशयातून त्यांना स्थानिकांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात तब्बल ११० आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातले ९ या प्रकरणातले प्रमुख आरोपी होते. ही घटना घडली, तेव्हा तिथे पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते, मात्र त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचे काही व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत.

दत्तात्रय शिंदे यांनी याआधी सिंधुदुर्ग आणि सांगलीचे पोलीस अधिक्षक म्हणून काम केलेले आहे. सध्या ते महाराट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत कार्यकरी संचालकपदावर कार्यरत होते. त्यांना तातडीने पालघरच्या अधीक्षकपदाचा कार्यभार हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, गौरव सिंग अजूनही पोस्टिंगच्या प्रतिक्षेत आहेत.

First Published on: May 23, 2020 4:18 PM
Exit mobile version