मुंबईनंतर ठाण्यात परमबीर सिंह यांची सात तास चौकशी

मुंबईनंतर ठाण्यात परमबीर सिंह यांची सात तास चौकशी

मुंबई गुन्हे शाखेच्या चौकशी पाठोपाठ ठाणे नगर पोलिसांनी परमबीर सिंह यांची सुमारे सात तास चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. दरम्यान, ठाणे न्यायालयाने सिंह यांच्या विरुद्ध जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे. क्रिकेट बुकी केतन यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्यासह २८ जणांविरुद्ध खंडणी, मारहाण, जबरी चोरी, कट रचणे, धमकी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात परमबीर सिंह सहपोलीस उपायुक्त दीपक देवराज, एसीपी ए.टी.कदम,एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे सह २८ जण आरोपी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या ठाणे नगर गुन्ह्यात आरोपी असलेला हॉटेल व्यावसायिक बिमल अग्रवाल हा गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तक्रारदार आहे.

शुक्रवारी सकाळी परमबीर सिंह हे आपल्या वकीलासह ठाणे नगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले होते. परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी परमबीर सिंह यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. दरम्यान या गुन्ह्यात ठाणे न्यायालयाने परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. सिंह हे ठाणे नगर पोलीस ठाण्यातून थेट ठाणे कोर्टात हजर झाले. यापुढे तपास यंत्रणेला चौकशीत सहकार्य करण्याची सिंह यांनी कोर्टाला हमी दिली. सिंह हे स्वतः कोर्टात हजर होऊन त्यांनी हमी दिल्यामुळे कोर्टाकडून त्यांच्याविरुद्ध जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे.

गृहविभागाची गोपनीय फाईल पुनामियाच्या मोबाईल फोनमध्ये 

खंडणी प्रकरणात अटकेत असलेला व्यावसायिक आणि परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय संजय पुनामिया याच्या मोबाईलमध्ये राज्याच्या गृहविभागाची गोपनीय फाईल सापडली आहे. ही फाईल त्याने आपल्या मुलाला पाठवून त्यावर चर्चा केल्याचे पुनामियाच्या उघडकीस आले आहे. याप्रकरणी मुंबई एसआयटीने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात संजय पुनामिया आणि मुलगा सनी पुनामिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही गोपनीय फाईल खासगी व्यक्तीच्या मोबाईलमध्ये कुठून कशी आली याची चौकशी सुरू आहे.

First Published on: November 27, 2021 5:55 AM
Exit mobile version