फोन पे, गुगल पेवरूनही लोकलचे तिकीट, प्रवाशांना यूपीआय पेमेंटची नवी सुविधा उपलब्ध

फोन पे, गुगल पेवरूनही लोकलचे तिकीट, प्रवाशांना यूपीआय पेमेंटची नवी सुविधा उपलब्ध

उपनगरीय रेल्वेचा प्रवास करताना प्रवाशांना रेल्वे तिकिटासाठी तिकीट खिडक्यांवरील लांब रांगेचा सामना करावा लागत होता, मात्र आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या एटीव्हीएम मशीनवर एक अनोखी सुविधा दिली आहे. आता प्रवाशांना आपल्या मोबाईल फोनमध्ये असलेल्या फोन पे, गुगल पे आणि पेटीएमसारख्या यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना स्मार्ट कार्ड वापरण्याचीही गरज उरणार नाही. थेट एटीव्हीएम मशीनद्वारे प्रवाशांना यूपीआय पेमेंट करून तिकीट मिळवता येणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वाढती ऑनलाईन सेवा पाहता रेल्वेनेही प्रवाशांना ही सुविधा दिली आहे. प्रवाशांना एटीव्हीएम मशीनवर क्यूआर कोड फ्लॅश होताना दिसेल. त्यानंतर तुम्हाला तो स्कॅन करावा लागेल. तुम्ही कोणत्याही यूपीआय अ‍ॅपच्या मदतीने लोकल ट्रेनच्या तिकिटांसाठी पैसे देऊ शकता. यापूर्वी रेल्वेकडून स्मार्ट कार्ड जारी केले जात होते, जे एटीव्हीएममध्ये तिकीट किंवा पास खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकत होते, पण आता रेल्वेने सुरू केलेल्या नव्या सुविधेनंतर प्रवाशांना यूपीआयद्वारे ट्रेनचे तिकीट खरेदी करता येणार आहे.

तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांची गर्दी कमी व्हावी तसेच प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने २०१४ मध्ये रेल्वे स्थानकांवर एटीव्हीएम मशीन सुरू केल्या होत्या. त्यामुळे रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील भारसुद्धा कमी झाला होता. एटीव्हीएम मशीनद्वारे प्रवाशांना डिजिटल पेमेंट सुविधा सुरू केल्याने एटीव्हीएम मशीनला संजीवनी मिळाली आहे.

First Published on: May 12, 2022 9:44 PM
Exit mobile version